वाहतुकीचे नियम मोडणे पडणार महागात; दंडाच्या रक्कमेत घसघशीत वाढ

नव्या तरतुदींनुसार गाडी चालवताना फोनवर बोलणाऱ्यांना ५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल. 

Updated: Aug 1, 2019, 08:27 AM IST
वाहतुकीचे नियम मोडणे पडणार महागात; दंडाच्या रक्कमेत घसघशीत वाढ title=

मुंबई: राज्यसभेत बुधवारी बहुचर्चित मोटर वाहन दुरुस्ती विधेयक २०१९ मंजूर करण्यात आले. त्यामुळे आता वाहतुकीच्या नव्या नियमांची अंमलबजावणी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या नियमांनुसार वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मुजोरांना आता मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. 

या नव्या नियमांनुसार आता हेल्मेट न वापरणाऱ्यास १०० रूपयांऐवजी एक हजार रुपये दंड आकारण्यात येईल. तर विनापरवाना (लायसन्स) गाडी चालवण्याचा गुन्हा घडल्यास पाच हजार रुपयांचा दंड भरावा लागेल. याबरोबरच वाहन चालकाचा परवानाही तीन महिन्यांसाठी जप्त केला जाईल. तसेच अनेकदा मोबाईलवर बोलण्याच्या नादात अनेक अपघात घडतात. या सवयीलाही आता चाप बसणार आहे. नव्या तरतुदींनुसार गाडी चालवताना फोनवर बोलणाऱ्यांना ५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल. 

तर मद्यप्राशन करून गाडी चालवणाऱ्यांसाठी दंडाची रक्कम १० हजार रुपये इतकी करण्यात आली आहे. याशिवाय, हिट अँड रन केसमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना दोन लाखांची भरपाई देण्याची तरतूदही नव्या नियमांमध्ये असेल. 

गेल्या काही वर्षांमध्ये देशातील रस्ते अपघातांचे प्रमाण वाढल्याची बाब केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत मान्य केली. या घटनांमुळे रस्ते सुरक्षाच्या सध्याच्या कायद्यात बदल करण्याची आवश्यकता आहे. सरकारचा मोटर वाहन दुरुस्ती विधेयकाद्वारे राज्यांच्या अधिकारात हस्तक्षेप करण्याचा कोणताही विचार नाही, असे स्पष्टीकरण गडकरी यांनी राज्यसभेतील चर्चेवेळी दिले. 

दरम्यान, या विधेयकामुळे वाहनधरकांसाठी नव्या सोयीसुविधाही उपलब्ध होणार आहेत. त्यानुसार आता टोल भरण्यासाठी टोलनाक्यावर वाहन थांबवण्याची गरज पडणार नाही. तसेच वाहन परवान्यासाठीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर संबंधित उमेदवाराला आपला परवाना ऑनलाईन मिळेल.