मुंबईत शिस्तबद्ध भली मोठी रांग, ना धक्काबुक्की की दमदाटी

उत्तर मुंबईतल्या एका ठिकाणचा हा व्हिडिओ आहे. इथे दुकानाबाहेर तब्बल सव्वाशेच्या घरात पोहोचेल इतकी ही मोठी रांग आहे.

Updated: Jul 31, 2019, 10:55 PM IST
मुंबईत शिस्तबद्ध भली मोठी रांग, ना धक्काबुक्की की दमदाटी title=

मुंबई : तसे पाहायला गेले तर गर्दी आणि रेटारेटी ही भारतीयांची एकप्रकारे ओळख झाली आहे. मात्र या धारणेलाच छेद देणारं चित्र पाहायला मिळालं. मोठ्ठी रांग, तीही शिस्तबद्ध आणि जराही गोंधळ नाही, असं हे चित्र होतं. कसली होती ही रांग आणि नेमकी कशासाठी. याची उत्सुकता आता तुम्हालाही आहे ना. चला तर जाणून घेऊ या.

एक... दोन... तीन... चार... पाच... सहा... हाताची बोटं कमी पडतील इतकी भलीमोठी रांग... कशाची ही नेमकी रांग... भारतात हौशींची संख्या काही कमी नाही... त्यामुळे अशी रांग कुठेही दिसू शकते... पण या रांगेचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी कुणीही रांगेला काबूत ठेवणारा पहारेकरी नाही... की धक्काबुक्की करुन रांग मोडून स्वतःला पुढे दामटणारा सुद्धा एकही नाही... ही रांग नेमकी कसली... देवळासमोरची म्हणावी तर एकाच्याही हातात फुलं, नारळ, अगरबत्ती किंवा मिठाईचा पुडाही नाही.

सिनेमाची म्हणावी तर या रांगेत उभ्या असलेल्यांच्या बहुतेकांच्या पेहेरावावरुन ही मंडळी आपला आवडता सिनेमा पाहण्यासाठी आले असावेत याची सुतरामही शक्यता नाही. ढगाळ वातावरण असताना आपला खोळंबा होऊ नये यासाठी सर्वच जण छत्री, रेनकोटच्या तयारीनिशी आले आहेत. सकाळची वेळ आहे आणि दिवसही मोक्याचा आहे... म्हणजे लक्षात येतंय ना... ही रांग आहे गटारीच्या सेलिब्रेशनसाठीची.

उत्तर मुंबईतल्या एका ठिकाणचा हा व्हिडिओ आहे. इथे मटणविक्रेत्याच्या दुकानाबाहेर तब्बल सव्वाशेच्या घरात पोहोचेल इतकी ही मोठी रांग आहे. सुरु होणारा चार्तुमास आणि त्याधीची गटारी... त्यातच नेमका बुधवारचा दिवस. म्हणजे खवय्यांसाठी मोठी पर्वणीच. मग काय विचारता. सगळा प्लान ठरलेला... फक्त त्याची सुरुवात झोकात आणि नेमकी करायची. यासाठी सकाळीच दुकानाबाहेर मटण खरेदीसाठी ही अशी भलीमोठी रांग लागली होती.

भारतीय शिस्त पाळत नाहीत, असं जो कोणी म्हणतो त्याला एकदा ही रांग दाखवलीच पाहिजे. स्वयंशिस्त म्हणजे काय त्याचा प्रत्यक्ष धडाच या मंडळींनी आपल्या कृतीतून दाखवून दिला आहे. कारण खाण्यासाठी सर्वकाही, हा खवय्यांचा पहिला नियम असतो.