मुंबईकरांनो, गुरुवारपासून मोठा बदल; आताच पाहा नाहीतर थेट पोलिसांशी गाठ

मुंबईत असणाऱ्या प्रत्येकासाठी महत्त्वाची बातमी 

Updated: Jun 8, 2022, 08:29 AM IST
मुंबईकरांनो, गुरुवारपासून मोठा बदल; आताच पाहा नाहीतर थेट पोलिसांशी गाठ  title=

मुंबई : गुरुवारपासून मुंबईकरांचं आयुष्य बदलणार असल्यामुळं सध्या अनेकांचीच लगबग दिसत आहेत. हातातली सगळी कामं बाजुला ठेवून दुचाकी असणारी मंडळी एकाच दिशेनं धावत आहेत. ही दिशा आहे, हल्मेटच्या दुकानांची. कारण, गुरुवारपासून मुंबईक वाहतुकीच्या नियमांमध्ये मोठे बदल होत आहेत. 

दुचाकीनं प्रवास करणाऱ्या सर्वांसाठीच ही बातमी महत्त्वाची. कारण, चालकासोबतच पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीलाही यापुढे हेल्मेट सक्तीचं असणार आहे. 

साधारण दोन आठवड्यांपूर्वी हेल्मेट सक्तीचा हा नियम जाहीर करण्यात आला. ज्याची अंमलबजावणी गुरुवार (9 जून 2022) पासून करण्यात येणार आहे. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी याबाबतची माहिती दिली. 

मुंबई पोलिसांनी हेल्मेट सक्तीच्या निर्णयानंतर मुंबईकरांना दिलेली सवलत आज (8 जून) संपत आहे. यानंतर प्रवासी आणि बाईक चालकांना कोणत्याही प्रकारची मुभा दिली जाणार नाही. 

मुंबईकरांनी सहप्रवाशाच्या हेल्मेट सक्तीला विरोध केला असला तरीही हा निर्णय मागे घेण्यात आलेला नाही. 40 किलोमीटर वेगानं प्रवास करताना कशाला हवं हेल्मेट, गल्लीबोळातून दुचाकी नेताना मागे असणाऱ्या व्यक्तीला हेल्मेट कशासाठी इथपासून, सर्व नियम मुंबईकरांवरच का लादण्यात येतात असे बोचरे प्रश्न मुंबईकरांनी विचारले. 

हेल्मेट नसल्यास कोणती कारवाई ? 
दुचाकीवर असणाऱ्या सहप्रवाशाच्या डोक्यावर हेल्मेट नसल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. शिवाय तीन महिन्यांसाठी चालक परवानाही निलंबित केला जाणार आहे. शिवाय 500 रुपये दंडाची रक्कमही आकारली जाणार आहे.