आता राष्ट्रवादीला बंडखोरीचं ग्रहण? राष्ट्रवादीचा 'हा' मोठा नेता देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला

ट्रेलर संपला... पिक्चर अजून बाकी ? राष्ट्रवादी नेत्याच्या भेटीने चर्चांना उधाण

Updated: Jul 1, 2022, 04:51 PM IST
आता राष्ट्रवादीला बंडखोरीचं ग्रहण? राष्ट्रवादीचा 'हा' मोठा नेता देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला title=

Maharashtra Politics : राज्यात 10 दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तानाट्यावर गुरूवारी अखेर पडदा पडला. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या राजकीय धक्क्यातून महाराष्ट्र सावरत असतानाच राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे रात्री उशीरा फडणवीसांच्या भेटीसाठी 'सागर' बंगल्यावर पोचले. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात नवे तर्क लढवले जाऊ लागलेत. 

अजित पवारांचे निकटवर्तीय
धनंजय मुंडे अजित पवारांचे निकटवर्ती आहेत. 2019मध्ये फडणवीस आणि अजित पवारांचा शपथविधी झाला त्यावेळी मुंडेंच्याच बंगल्यावरून राष्ट्रवादीची सूत्र हालली होती. भाजयुमोमध्ये असल्यापासून फडणवीसांशी मुंडेंची चांगली मैत्री आहे. सत्तांतर नाट्य घडत असताना शिंदेंच्या बंडामागे राज्यातील भाजपच्या मोठ्या नेत्याचा हात दिसत नाही, असं म्हणत अजितदादांनी एक प्रकारे फडणवीसांची बाजू घेतली होती. त्यामुळेच पडद्यामागे आणखीही काही घडतंय का, याची चर्चा सुरू झाली आहे. 

राष्ट्रवादीकडून सारवासारव
अर्थात राष्ट्रवादीनं या भेटीमागे राजकीय अर्थ काढू नये, असं म्हणत बाजू सावरून घेतलीये. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस युतीत सत्तेत असताना कायम एकत्र राहिले आहेत. त्यांचे संबंध चांगले आहेत. धनंजय मुंडे राष्ट्रवादीचे नेते आहेत. सदिच्छा भेट म्हणून धनंजय मुंडे फडणवीस यांना भेटले असतील असं राष्ट्रवादीकडून सांगण्यात येत आहे. 

धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जवळपास अर्धा तास भेट झाली. या भेटीत नेमकं काय चर्चा झाली हे अद्याप समोर आली नाही. मात्र रात्री साडेबारा वाजता धनंजय मुंडे यांनी फडणवीसांची भेट घेतली. सध्याच्या राजकीय घडामोडीत या भेटीला विशेष महत्त्व आहे. 

गेल्या काही दिवसांत महाराष्ट्राला राजकीय धक्के बसतायत. ही धक्क्यांची मालिका अद्याप संपली नसल्याची कुजबुज सुरू आहे. त्यामुळेच फडणवीस-मुंडे भेटीची एवढी चर्चा रंगतेय.