उदयनराजे कोणत्या अवस्थेत बोललेत हे पाहावे लागेल; जयंत पाटलांचा टोला

थोरामोठ्यांनी आपल्याला काही गोष्टी लहानपणापासून शिकवलेल्या असतात.

Updated: Sep 27, 2019, 05:51 PM IST
उदयनराजे कोणत्या अवस्थेत बोललेत हे पाहावे लागेल; जयंत पाटलांचा टोला title=

मुंबई: शरद पवार यांना या जन्मात केलेल्या गोष्टी याच जन्मात फेडाव्या लागतील, अशी टीका करणाऱ्या उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी त्यांच्यावर टीका करताना म्हटले की, उदयनराजे ते आता फेडतायत, ते निवडणुकीतही फेडतील. मात्र, शरद पवार यांच्यावर त्यांनी कोणत्या अवस्थेत टीका केली हे पाहावे लागेल. त्याशिवाय उदयनराजेंविषयी अधिक बोलणार नाही, असे जयंत पाटील यांनी सांगितले. 

राज्य सहकारी बँकेतील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) नुकताच शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. मात्र, आपण राज्य सहकारी बँकेचे सभासद आणि संचालक नसतानाही आपल्यावर गुन्हा का दाखल झाला, याचा जाब विचारण्यासाठी शरद पवार शुक्रवारी ईडीच्या कार्यालयात जाणार होते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते.

ईडी कार्यालयाकडे जाण्याचा शरद पवारांचा निर्णय तहकूब

या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्यावर सरकार सूडबुद्धीने कारवाई करत आहे का, अशी विचारणा उदयनराजेंना करण्यात आली. त्यावर उदयनराजेंनी म्हटले की, याविषयी तुम्ही संबंधित व्यक्तींना विचारले तर बरे होईल. कारण, मी कोणत्याही खात्याचा मंत्री नाही. तसेच व्यक्तीद्वेषातून मी कधी कोणावर टीकाही करत नाही. 

परंतु, थोरामोठ्यांनी आपल्याला काही गोष्टी लहानपणापासून शिकवलेल्या असतात. आपल्याकडे एक जुनी म्हण आहे, आपण जसं वागतो, ते याच जन्मी आपल्याला फेडावं लागतं. मीदेखील काही चुकीचं केलं असेल तर मलाही ते फेडावं लागेल, असे उदयनराजेंनी सांगितले.