लहान भावाने चाकूने मानेवर केले वार, त्याच अवस्थेत मोठ्या भावाने गाठलं रुग्णालय... धक्कादायक घटना

Navi Mumbai Crime : गळ्यात चाकू अडकलेल्या जखमी अवस्थेत तरुणाने स्वत:हून स्कूटीवरुन हॉस्पिटल गाठले होते. विशेष म्हणजे वेळीच उपचार आणि डॉक्टरांच्या तप्तरतेमुळे तो आता स्वस्थ आहे. 

Updated: Jun 6, 2023, 04:49 PM IST
लहान भावाने चाकूने मानेवर केले वार, त्याच अवस्थेत मोठ्या भावाने गाठलं रुग्णालय... धक्कादायक घटना title=

स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई : नवी मुंबईच्या (Navi Mumbai Crime) सानपाडा परिसरामध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सानपाडा येथे एका तरुणावर त्याच्याच लहान भावाने हल्ला केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. घरात झोपलेला असताना लहान भावाने तरुणावर चाकूने हल्ला केला. आश्चर्याची बाब म्हणजे हल्ला झाल्यानंतर तरुणाने स्कूटी चालवत रुग्णालय गाठले होते. तरुण मानेमध्ये चाकू अडकलेल्या परिस्थिती रुग्णालयात पोहोचताच सर्वांनाच धक्का बसला. शेवटी डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करत तरुणाला जीवनदान दिलं आहे.

सानपाडा सेक्टर-5 मध्ये राहणाऱ्या तेजस जयदेव पाटील याच्यावर घरात असताना लहान भावाने चाकूने हल्ला करुन पळ काढला होता. सानपाडा पोलिसांनी (Sanpada Police) या प्रकरणात अज्ञात मारेकऱ्या विरोधात जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला होता. दरम्यान, चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तेजसवर सानपाडा मधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  

या घटनेतील जखमी तेजस हा पत्नी सोबत सानपाडा सेक्टर-5 मध्ये दत्त मंदिरासमोर राहण्यास आहे. तेजसची पत्नी गरोदर असल्याने दोन दिवसापूर्वीच ती उलवे येथे आपल्या माहेरी गेली होती. त्यामुळे तेजस सध्या घरामध्ये एकटाच होता. शनिवारी सकाळी तेजस घरामध्ये झोपलेला असताना, त्याचा लहान भावाने त्याच्या घरामध्ये प्रवेश करुन त्याच्या मानेवर चाकूने हल्ला करुन पलायन केले. यावेळी हा चाकू तेजसच्या मानेमध्ये राहिल्याने त्याने त्याच अवस्थेत जवळचे एमपीसीटी रुग्णालय आपल्या स्कूटीवरुन गाठले. त्यानंतर त्याने आपल्या पत्नीला सदर प्रकाराची माहिती दिली.  

डॉक्टरांनी तेजसवर चार तास शस्त्रक्रिया करुन त्याच्या मानेत घुसलेला चाकू यशस्वीरित्या बाहेर काढला. सध्या तेजसची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या त्याचा भावाचा पोलीस सध्या शोध घेत असून, जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापुराव देशमुख यांनी दिली. 

"शनिवारी सकाळी झोपलेलो असताना भाऊ आणि भावाच्या मित्राने चाकूने वार केला. त्यानंतर मी त्यांच्या अंगावर धावून गेलो. त्यानंतर ते तिथून पळून गेले. त्यानंतर मी स्कूटी सुरु करुन थेट रुग्णालयात पोहोचलो. त्यावेळी माझ्या मानेला चाकू होता. चक्कर येत असतानाही मी गाडी चालवत होतो. ते दोघेही माझ्या पाठीमागेच होते. आरोपींना अद्याप करण्यात आलेली नाही. हा हल्ला माझा छोटा भाऊ मनीष पाटील याने केला आहे," असे तेजसने सांगितले.

डॉक्टरांनी काय सांगितले?

"सेक्टर पाच येथे राहत असलेला रुग्ण स्वतः बाईक चालवत दवाखान्यात आला होता. त्यावेळी चाकू मानेच्या आतच होता. त्यावेळी सगळ्यात आधी रुग्णाचे सीटी स्कॅन करण्यात आले. त्यानंतर लगेचच त्याला शस्त्रक्रिया विभागात हलवले. चार ते पाच तासांच्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला सामान्य विभागात हलवण्यात आले. सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे," अशी माहिती तेजसवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे.