अखेर नारायण राणेंनी भाजपाची ऑफर स्वीकारली

नारायण राणेंनी अखेर राज्यसभेत जाण्याची भाजपनं दिलेली ऑफर स्वीकारली आहे. येत्या सोमवारी राणे राज्यसभेच्या निवडणूकीसाठी अर्ज भरणार आहेत.

Updated: Mar 10, 2018, 04:08 PM IST
अखेर नारायण राणेंनी भाजपाची ऑफर स्वीकारली title=

दीपक भातुसे / मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांनी अखेर आठवडाभराने भाजपाची राज्यसभेची ऑफर स्वीकारली आहे. सोमवारी ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. 

 मंत्रीपद देण्याचे आश्वासन फोल

नारायण राणे यांनी काँग्रेस सोडताना भाजपाने त्यांना राज्यात  मंत्रीपद देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र भाजपाने मंत्रीपदाचे आश्वासन पाळले नाहीरा आणि राज्यसभेवर राणेंची बोळवण केली आहे. 

राज्यसभेची ऑफर स्वीकारली 

राज्यसभेसाठी भाजपकडून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कालच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र नारायण राणे यांनी आपला निर्णय जाहीर केला नव्हता.  त्यामुळे इतर दोन नावांची घोषणा करण्यात आली नाही. मात्र अखेर नारायण राणे यांनी राज्यसभेची ऑफर स्वीकारली असून, सोमवारी ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. 

शिवसेनेकडून अनिल देसाई 

राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी येत्या २३ मार्च रोजी निवडणूक होत आहे. राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जागांमध्ये महाराष्ट्रामधील सहा जागांचा समावेश आहे. राष्ट्रवादीकडून वंदना चव्हाण, शिवसेनेकडून अनिल देसाई यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.  तर काँग्रेस पक्षाने अजून आपल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केलेली नाही.       

२३ मार्च रोजी मतदान  

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी १२ मार्च रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.१३ मार्च रोजी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे तर; १५ मार्च ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. सहा जागांसाठी जास्त उमेदवारी अर्ज आल्यास २३ मार्च मतदान घेण्यात येणार आहे.परंतु सध्या प्रत्येक पक्षाचे संख्याबळ बळ पाहता ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.