लागवड खर्च दुप्पट आणि भाव दहा वर्षांपूर्वीचा; 'सोयाबीन उत्पादकांनी जगायचं कसं?'

Nanded Soybean: मागील दहा वर्षात सोयाबीनचा उत्पादन खर्च दुप्पट झालाय पण भाव मात्र तेवढाच आहे.

Updated: May 31, 2024, 09:33 PM IST
लागवड खर्च दुप्पट आणि भाव दहा वर्षांपूर्वीचा; 'सोयाबीन उत्पादकांनी जगायचं कसं?' title=
Nanded Soybean

सतीश मोहिती, झी 24 तास नांदेड:  मराठवाड्यात सर्वाधिक घेतलं जाणारं पीक म्हणजे सोयाबीन... मात्र मागील दहा वर्षात सोयाबीनचा उत्पादन खर्च दुप्पट झालाय पण भाव मात्र तेवढाच आहे.. यामध्ये कसं जगावं? असा सवाल मराठवाड्यातला शेतकरी विचारतोय.

एकरी केवळ 20 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न 

मारोतराव पावडे हे नांदेडच्या पुयनी गावात राहतात. गेल्या हंगामात पावडे यांनी आपल्या चार एकरात सोयाबीनची लागवड केली. लागवडीपासून ते काढणीपर्यंत एकरी सतरा ते अठरा हजार रुपयांचा त्यांना खर्च आला.. आणि त्यांना एकरी केवळ 20 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळालं.. म्हणजे शेतात गाळलेल्या घामाचे दाम केवळ एकरी तीन हजार रूपये.. मागील दहावर्षांमध्ये शेतकऱ्याचा उत्पादन खर्च दुप्पट झाला मात्र 10 वर्षांपासून सोयाबिनला भाव मात्र तोच मिळतोय..

खर्च दुप्पट 

मागील 10 वर्षांपासून खत, मजुरी, काढणी, खुरपणी, यांचा खर्च दुप्पट झालाय. सोयाबीन तेलाचे दरही दुप्पट झाले.. मात्र दहा वर्षात सोयाबीनचा भाव का वाढला नाही असा सवाल शेतकरी करताहेत. 

सोयाबीनचे भाव न वाढण्याला सरकारचे धोरण कारणीभूत असल्याचं जाणकारांचं मत आहे.

हमीभाव देण्याची आश्वासनं 

शेतमालाला हमीभाव देण्याची आश्वासनं आतापर्यंत अनेकदा दिली गेली मात्र त्याच्या पुर्ततेसाठी कोणत्याच सरकारचे प्रयत्न दिसले नाहीत..  शेतकऱ्याच्या तोंडाला केवळ पान पुसण्याचं काम आतापर्यंतच्य़ा सगळ्याच सत्ताधाऱ्यांनी केल्याचं दिसतंय..