विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरवणाऱ्यांवर कडक कारवाई करा, नाना पटोले यांची मागणी

विद्यार्थ्यांना भडकावून त्यांच्या भवितव्याशी खेळू नका !  नाना पटोले 

Updated: Jan 31, 2022, 06:16 PM IST
विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरवणाऱ्यांवर कडक कारवाई करा, नाना पटोले यांची मागणी title=

मुंबई : दहावी, बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घ्याव्यात या मागणीसाठी मुंबई, नागपूर, औरंगाबाद आणि उस्मानाबादमध्ये हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. या विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरवून त्यांच्या भवितव्याशी खेळणे अत्यंत चुकीचे आहे. महाराष्ट्र विकास आघाडी सरकार विद्यार्थ्यांच्या पाठीशी असून त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यावर चर्चा करुन सरकार मार्ग काढेल परंतु कोणाच्यातरी सांगण्यावरून विद्यार्थ्यांनी चुकीचा मार्ग अवलंबू नये, असं आवाहन महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे.

कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून शाळा, कॉलेज बंद असली तरी शिक्षणात खंड पडू नये व विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून मविआ सरकारने ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरुच ठेवलेलं आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्यसुद्धा तेवढेच महत्वाचे आहे. 

शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून त्या पूर्ववत सुरु कराव्यात तसेच परीक्षा ऑफलाईन घ्याव्यात अशी मागणीही मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. सर्व बाजूंनी विचार करूनच सरकारने निर्णय घेतलेला आहे. विद्यार्थी व पालक यांना अजूनही काही शंका, समस्या असतील तर त्यावर चर्चा करून निर्णय घेतला जाऊ शकतो त्यासाठी विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरवणं चुकीचं आहे, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मुद्दा पुढे करत काही पक्ष राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरवून त्यावर राजकारण करणं अयोग्य आहे. कोरोनाची दुसरी लाट असताना एमपीएससीच्या परिक्षेचा मुद्दा घेऊन अशाच पद्धतीने विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरवून काही राजकीय पक्षांनी आंदोलन केले होतं. 

या आंदोलनातून अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची लागणही झाली होती. विद्यार्थ्यांचे आरोग्य हे सर्वात महत्वाचे आहे. सरकारने शिक्षणासंदर्भात सर्व स्तरातील लोक, विद्यार्थी, पालक, शिक्षणतज्ञ यांची मते विचारात घेतलेली आहेत असे असताना विद्यार्थ्यांच्या आडून राज्यातील वातावरण बिघडवण्याचं काम कोणी करू नये, विद्यार्थ्यांना भडकवू नका, विद्यार्थ्यांनीही अभ्यासावर लक्ष द्यावं, असं आवाहन नाना पटोले यांनी केलं.

मविआ सरकार विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्याशी मी बोलून मार्ग काढण्याचा प्रयत्न करेन, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.