डिश अँटेना सरळ करताना तोल गेला अन् गच्चीवरून पडून 14 वर्षीय मुलगा जीवाला मुकला

Nalasopara News : नालासोपारा येथे इमारतीच्या गच्चीवरुन पडल्याने 14 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. इमारतीच्या गच्चीवर अल्पवयीन मुलगा टीव्हीचा डिश अँटेना सरळ करण्यासाठी गेला होता. मात्र तोल गेल्याने तो थेट खाली कोसळला.

आकाश नेटके | Updated: Aug 4, 2023, 01:58 PM IST
डिश अँटेना सरळ करताना तोल गेला अन् गच्चीवरून पडून 14 वर्षीय मुलगा जीवाला मुकला title=

प्रथमेश तावडे, झी मीडिया, विरार : टीव्हीचा (TV) डिश अँटेना सरळ करण्यासाठी इमारतीच्या गच्चीवर गेलेल्या 14 वर्षीय मुलाचा तोल जाऊन खाली पडून मृत्यू झाला आहे. नालासोपारा (Nalasopara) पूर्वेच्या मोरे गावमधील शिवम नगर येथे गुरुवारी दुपारी ही दुर्दैवी घटना घडली. थेट गच्चीवरुन खाली पडल्याने अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Nalasopara Police) घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरु केला. पोलिसांनी याप्रकरणाची नोंद केली आहे.

आदर्श मिश्रा असे या दुर्घटनेत मरण पावलेल्या मुलाचे नाव आहे. नालासोपारा पूर्वेच्या मोरे गाव मधील शिवम नगर येथे साई सृष्टी हाईट्स ही आठ मजली इमारत आहे. या इमारतीमध्ये पाचव्या मजल्यावर मिश्रा कुटूंबिय राहतात. मात्र गुरुवारी आदर्शचे आई वडील उत्तरप्रदेश येथील गावी गेले होते. त्यामुळे घरी आदर्श मिश्रा आणि आरती मिश्रा ही दोन्ही मुले घरी एकटीच राहात होती. दुपारी दोन्ही भाऊ बहीण घरात टीव्ही बघत बसले होते. मात्र टीव्हीचे प्रक्षेपण नीट दिसत नसल्याने आदर्श डिश अँटेना सरळ करण्यासाठी इमारतीच्या गच्चीवर गेला होता. गच्चीवर डिश अँटेना सरळ करत असताना आदर्शचा तोल गेला. त्यामुळे तो थेट इमारतीच्या खाली कोसळला.

इमारततील्या लोकांना हा सर्व प्रकार समजताच त्यांनी खाली धाव घेतली. इमारतीमधील रहिवाशांनी तात्काळ आदर्शला उपचारासाठी नालासोपारा महापालिकेच्या तुळींज येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र तिथे उपचारा दरम्यानच आदर्शचा मृत्यू झाला. या प्रकरणी गुरुवारी रात्री तुळींज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, आदर्श हा याच परिसरातील सेंट अँथॉनी शाळेत नवव्या इयत्तेत शिकत होता. आदर्शच्या मृत्यूची बातमी त्यांच्या कुटुंबियांना दिल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमिनच सरकली. आदर्शच्या मृत्यूनंतर साई सृष्टी हाईट्स इमारतीमध्ये शोककळा पसरली आहे. 

यापूर्वीही अनेकदा गेला होता गच्चीवर

टीव्हीचा डिश अँटेना सरळ करण्यासाठी तो यापूर्वी अनेकदा गच्चीवर जायचा, अशी माहिती आदर्शच्या शेजारच्यांनी दिली आहे. आदर्शच्या दुर्दैवी मृत्यूबद्दल परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणी गुरुवारी रात्री तुळींज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.