प्रभागसमितीच्या सदस्यसंख्येचा घोळ संपला, मुंबई वगळता इतर महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत

आज झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे

Updated: Sep 22, 2021, 07:11 PM IST
प्रभागसमितीच्या सदस्यसंख्येचा घोळ संपला, मुंबई वगळता इतर महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत title=

मुंबई : राज्यात महापालिका आणि नगरपालिकांमध्ये बहुसदस्य प्रभाग पद्धत लागू करण्यास मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. मुंबई वगळता इतर महापालिकांमध्ये तीन सदस्यीय प्रभाग पद्धत ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसंच नगर पंचायतींमध्ये एक तर नगर परिषद, नगर पालिकांमध्ये दोन सदस्यांचे प्रभाग असतील. 

महापालिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं दोन सदस्यांची रचना असावी, असा आग्रह धरला होता. तर शिवसेनेची 4 सदस्यांची मागणी होती. याचा सुवर्णमध्य काढण्यात आला आहे. ओबीसी आरक्षणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबवण्यासाठी सरकारनं ही खेळी खेळल्याचं बोललं जातं आहे.  

2017 च्या मनपा निवडणुकीत पुणे, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, नागपुरात भाजपने एकहाती सत्ता मिळवली होती. पण यानंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येताच कायद्यात बदल करून पुन्हा एक सदस्यीय प्रभाग पद्धत आणली. पण आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुंबई वगळता इतर महापालिका निवडणुकीसाठी तीन सदस्यीय प्रभाग पद्धत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल, मिरा-भाईंदर, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर या महापालिकांच्या निवडणुका पुढील वर्षी होणार आहेत.