Mumbai Coastal Road News: मुंबई महानगरपालिकेचा महत्त्वाकांक्षी असा मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (Coastal Road) शुक्रवार, दिनांक २६ एप्रिल २०२४ रोजी एक आव्हानात्मक टप्पा गाठणार आहे. मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाला सांधणारी पहिली तुळई (बो आर्च स्ट्रिंग गर्डर) शुक्रवारी पहाटे प्रवाहकीय हवामानानुसार स्थापन करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या आव्हानात्मक मोहिमेसाठी साधारणपणे पाच ते सहा तासांचा अवधी लागणार असून यासाठी महानगरपालिका प्रशासन आणि तांत्रिक पथक सज्ज आहे.
मुंबईच्या दक्षिण टोकापासून म्हणजेच नरिमन पॉइंटपासून वरळी-वांद्रे सागरी सेतूपर्यंत वेगाने पोहोचण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) उभारण्यात येत आहे. कोस्टल रोड पहिल्या टप्प्यात वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. वरळी ते मरीन ड्राइव्हपर्यंत वाहतुक सुरू झाली आहे. त्यानंतर आता कोस्टल रोड आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाचे वरळीकडील टोक जोडण्यात येणार आहे. यासाठी पहिली तुळई (बो आर्च स्ट्रिंग गर्डर) शुक्रवारी 26 एप्रिल रोजी स्थापन करण्यात येणार आहे.
न्हावा बंदरातून प्रवास करत हा गर्डर वांद्रे-वरळी सागरी सेतू ज्या ठिकाणी मुंबई किनारी रस्त्याला जोडला जाणार आहे, तिथपर्यंत पोहोचली आहे. अडीच हजार मेट्रीक टन वजन असलेल्या बार्जवरून हा गर्डर आणला आहे. यानंतर मे २०२४ अखेरपर्यंत उत्तर वाहिनी दुसरी मार्गिकेची तुळईची देखील जोडणी करण्यात येणार आहे. ही दुसरी तुळई सध्या न्हावा बंदरात आहे. शुक्रवारी पहिली तुळई जोडल्यानंतर दुसरी तुळई आणून नंतर जोडण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.
पहिली तुळई ही वरळीकडून नरिमन पाईंट दिशेला जाणाऱ्या मार्गावर स्थापन करण्यात येणार आहे. ही तुळई दोन हजार मेट्रीक टन वजनाची आहे. तसेच १३६ मीटर लांब आणि १८ ते २१ मीटर रुंद आहे. जॅकचा वापर करून स्थापन केली जाणारी ही तुळई वांद्रे-वरळी सागरी सेतू आणि मुंबई किनारी मार्गाच्या नरिमन पॉईंटकडे जाणाऱ्या बाजूला सांधणार आहे.
मुंबई किनारी मार्गावरून वांद्रे-वरळी सागरी सेतूकडे जाणाऱ्या मार्गावर दुसरा गर्डर देखील बसवण्यात येणार आहे. हा दुसरी गर्डर अडीच हजार मेट्रीक टन वजनाचा आहे. तसेच १४३ मीटर लांब आणि २६ ते २९ मीटर रुंद आहे. हा गर्डर स्थापन केल्यानंतर मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू पूर्णपणे जोडले जाणार आहेत.