मुंबई : लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पश्चिम रेल्वे आता लोकलला एसी डबे जोडणार आहे. १२ डब्यांच्या लोकलमध्ये ३ डबे एसी असतील, तर १५ डब्यांच्या लोकलमध्ये ६ डबे एसी असणार आहेत. येणाऱ्या उन्हाळ्यात या सेमी एसी ट्रेन पश्चिम रेल्वेवर धावतील असा विश्वास रेल्वे प्रशासनानं व्यक्त केला आहे.
एसी डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढवण्यासाठी पश्चिम रेल्वेनं हा उपक्रम हाती घेतलाय. या एसी डब्याचं तिकीट सध्य़ाच्या फर्स्ट क्लासपेक्षा दीडपट जास्त असेल असं सांगण्यात येतं आहे. रेल्वेच्या वेळापत्रकात कोणताही बदल न करता या ट्रेन चालवण्याची पश्चिम रेल्वेची योजना आहे.
पश्चिम रेल्वेवर सध्या एसी लोकल धावत आहे. या लोकलचे सगळेच डबे एसी आहेत. याच धर्तीवर मध्य रेल्वेवरही एसी लोकल दाखल झाली आहे, पण या लोकलची सेवा अजून प्रवाशांसाठी सुरु झालेली नाही. चेन्नईच्या आयसीएफ रेल्वे कारखान्यात या लोकलची निर्मिती झाली आहे.
येत्या १५ दिवसांत मध्य रेल्वेच्या मुख्य लाईन, ट्रान्सहार्बर आणि हार्बर मार्ग अशा तिन्ही मार्गावर ही लोकल धावेल अशी अपेक्षा आहे. मध्य रेल्वेच्या प्रवाशांनी एसी लोकलचं स्वागत केलंय. एसी लोकलचे दर सर्वसामान्यांना परवडतील असे असावेत अशी अपेक्षा प्रवाशांनी व्यक्त केल्या आहेत.