मुंबई : मुंबई विद्यापीठाला एप्रिल महिन्यात नवे कुलगुरू मिळण्याची शक्यता आहे. पेपर तपासणीतील गोंधळामुळे डॉ. संजय देशमुख यांची कुलगुरुपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती.
नव्या कुलगुरूंच्या निवडीसाठी कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीला तीन महिन्यात त्यांच्याकडे आलेल्या अर्जांची छाननी करून पाच नावे राज्यपालांकडे पाठवायची आहेत. ६ जानेवारी २०१८ रोजी या समितीचे काम सुरू झाले आहे. ६ एप्रिलपर्यंत ही समिती पाच नावे राज्यपालांकडे पाठवण्याची शक्यता आहे.
ही नावे आल्यानंतर २ ते ३ दिवसात राज्यपाल या पाच नावांपैकी एका नावाची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी घोषणा करतील. त्यामुळे एप्रिल महिन्यातच मुंबई विद्यापीठाला नवे कुलगुरू मिळण्याची शक्यता आहे. सध्या निवड समितीकडे कुलगुरूपदासाठी ६० च्या वर अर्ज आल्याची माहिती मिळाली आहे.