MU Senet Election: राजकारणातले दोन ठाकरे एकत्र मैदानात? सिनेट निवडणुकांवरून राजकारण तापलं!

Mumbai University Stayed Senate Graduate Election:  मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत तिरंगी लढत पहायला मिळण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या चर्चा आहे ती ठाकरे बंधुंची...

Updated: Aug 18, 2023, 10:19 PM IST
MU Senet Election: राजकारणातले दोन ठाकरे एकत्र मैदानात? सिनेट निवडणुकांवरून राजकारण तापलं! title=
amit thackeray, aditya thackeray

Mumbai University Senate Election : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांची निवडणुक स्थगिती करण्यात आली असली तरी निवडणुकीपूर्वीच शिंदे गटानं पुन्हा एकदा ठाकरेंना धक्का दिलाय. 10 माजी सिनेट सदस्यांपैकी चार सदस्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झालेत. प्रवीण पाटकर या सिनेट सदस्याने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केलाय. या सदस्यांच्या शिंदे गट प्रवेशानं सिनेट निवडणुकीत आता शिंदे गटानेही उडी घेतल्याचं स्पष्ट होतंय. त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत तिरंगी लढत पहायला मिळण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या चर्चा आहे ती ठाकरे बंधुंची...

सिनेटसाठी ठाकरे एकत्र?

राज्याच्या राजकारणातले दोन ठाकरे आता एकत्र मैदानात उतरले आहेत. एक आहेत आदित्य ठाकरे तर दुसरे आहेत अमित ठाकरे. निमित्त आहे मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचं.. मुंबई विद्यापीठाने सिनेट निवडणूक अचानक स्थगित करण्याचा निर्णय घेतला आणि त्याविरोधात दोन्ही ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आदित्य ठाकरेंनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच लक्ष्य केलंय. 

सव्वा लाख मतदारांनी नोंदणी केली होती, मग स्थगिती का दिली? शिंदे आणि भाजप सरकार निवडणुकीला घाबरतं हे जनतेला कळालंय. सरकार आपल्या दारी, निवडणुकीला घाबरी असं म्हणायची वेळ आलीय. घटनाबाह्य मुख्यमंत्री डरपोक आहेत, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी भाजपवर निशाणा लगावला आहे. सिनेट निवडणुकीत ठाकरे गटाला चारीमुंड्या चित करू असा पलटवार आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंच्या आरोपांवर केलाय. दुसरीकडे मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनीही राज्यपालांना पत्र लिहित शिंदे आणि फडणवीसांना लक्ष्य केलंय. या प्रकरणात राज्यपालांनी लक्ष घालण्याची मागणी अमित ठाकरेंनी केली आहे. 

अमित ठाकरे आक्रमक

नेमक्या कोणत्या कारणाने निवडणूक रद्द करण्यात आली? विद्यापीठ प्रशासन नेमकं कुणाला घाबरत आहे? दिल्लीतल्या सत्ताधीशांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात सत्तेवर आलेल्यांना लोकशाही गाडून हुकूमशाहीनेच कारभार हाकायचा आहे, हे यावरुन स्पष्ट आहे. विद्यापीठाचे पदसिद्ध कुलपती म्हणून आपण या अतिसंवेदनशील प्रकरणात जातीने लक्ष घालावे, अशी विनंती अमित ठाकरे यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात केलीये. सिनेट निवडणूक रद्द करण्यासाठी आज 'पहाटे'चा मुहूर्त निश्चित केला नाही, यासाठी कुलपतींचे मन:पूर्वक आभार! असा टोलाही अमित ठाकरे यांनी लगावला आहे.

आणखी वाचा - MU Senet Election:आदित्य ठाकरेंनी मुंबई विद्यापीठाला विचारले 'हे' 5 प्रश्न

दरम्यान, मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीला स्थगिती दिल्यानंतरही ठाकरे गट युवासेनेकडून सर्व 10 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. मनसेही आपले उमेदवार उतरवणार आहे. तेव्हा सिनेट निवडणुकीत ठाकरे गट आणि मनसे आमने सामने येण्याची चिन्ह आहेत. मात्र या निवडणुकीच्या निमित्ताने आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे मात्र सरकारविरोधात आक्रमकपणे एकत्र उभे ठाकलेले पाहायला मिळालेत.