मुंबई विद्यापीठाचा पेपर आपल्या हाती! परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका अन् उत्तरे विद्यार्थ्याच्या व्हॉट्सअ‍ॅपवर

Mumbai University : मुंबई विद्यापीठाकडून घेण्यात येणाऱ्या टी.वाय.बी.कॉमच्या परीक्षेचा पेपर एका विद्यार्थ्याच्या मोबाईलवर सापडल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.

Updated: Nov 3, 2023, 08:28 AM IST
मुंबई विद्यापीठाचा पेपर आपल्या हाती! परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका अन् उत्तरे विद्यार्थ्याच्या व्हॉट्सअ‍ॅपवर title=

Mumbai News : मुंबई विद्यापीठाकडून (mumbai university) घेण्यात येणाऱ्या परीक्षेचा पेपर लीक झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. मुंबई विद्यापीठाकडून घेण्यात येणाऱ्या टी.वाय.बी.कॉमच्या (सत्र- 5) परीक्षेपूर्वीच उत्तरपत्रिका व्हॉट्सअॅपवर (whatsapp) आल्याचा धक्कादायक प्रकार सिद्धार्थ कॉलेजमधून (siddharth college) समोर आला आहे. या सगळ्या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर आझाद मैदान पोलिसांनी (Mumbai Poilice) दोन विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. फसवणुकीसह महाराष्ट्र विद्यापीठ मंडळाच्या व इतर परीक्षांमधील गैरप्रकार प्रतिबंध अधिनियम कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

फोर्ट येथील सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड इकॉनॉमिक्सच्या सहाय्यक प्राध्यापक सुमेध जगन्नाथ माने यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. मुंबई विद्यापीठाची हिवाळी सत्राची सध्या परीक्षा सुरू आहे. सिद्धार्थ कॉलेजमध्ये टी.वाय.बी. कॉम.ची (सत्र- 5) परीक्षा सुरू आहे. 31 ऑक्टोबरला सकाळी साडेदहा ते दुपारी दीडच्या सुमारास कॉमर्स-5 या विषयाचा पेपर होणार होता. त्यासाठी परीक्षा केंद्राचा वॉटरमार्क क्रमांक ठरलेला होता. परीक्षा हॉलमध्ये माने कनिष्ठ पर्यवेक्षक म्हणून जबाबादारी पार पाडत असताना त्यांना एका विद्यार्थ्याच्या मोबाइलच्या व्हॉट्सॲपवर कॉमर्स-5 या विषयाची प्रश्नपत्रिका आणि ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांची उत्तरे असल्याचे दिसून आले. त्यावेळी माने यांनी विद्यार्थ्याचा मोबाइल ताब्यात घेतला. मात्र विद्यार्थ्याकडे असलेल्या प्रश्नपत्रिकेवरील वॉटरमार्क क्रमांक त्यांच्या परीक्षा केंद्राचा नसून, अन्य परीक्षा केंद्राचा असल्याचे माने यांच्या लक्षात आले. त्यानंतर माने यांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

आरोपी विद्यार्थी हा गिरगाव येथील भवन्स कॉलेजचा विद्यार्थी आहे. त्याला त्याचा मित्र व गुन्ह्यातील सहआरोपीने सकाळी 9.37 वाजता व्हॉट्सॲपद्वारे ही प्रश्नपत्रिका पाठवली होती. याबाबत तत्काळ कॉलेज प्रशासनातर्फे मुंबई विद्यापीठाकडे तक्रार करण्यात आली होती.

या सगळ्या प्रकाराची माहिती मुंबई विद्यापीठाला कळवण्यात कळवण्यात आल्यानंतर त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. यासंदर्भात तक्रार आली आहे पण पेपर फुटलेला नाही. एकाच मुलाच्या व्हॉट्सॲपवर पेपर आल्याचे आढळून आले. याबाबत पोलीस तपासात अधिक माहिती पुढे येईल, असे स्पष्टीकरण विद्यापीठाकडून देण्यात आले आहे.

दरम्यान, ही प्रश्नपत्रिका नेमकी कुणाकडून कशी मिळाली? यामध्ये पैशांचे का व्यवहार झाले आहेत का? याबाबत पोलिस अधिक तपास करत आहे. यामध्ये आणखी किती जणांचा सहभाग आहे? याचाही पोलीस शोध घेत आहे.