Mumbai University College: मुंबई विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या १२ स्वायत्त महाविद्यालयांना अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयाचा (Empowered Autonomous College) दर्जा देण्यात आला आहे. नुकत्याच पार पडलेल्या विद्या परिषदेच्या शिफारशीवरून व्यवस्थापन परिषदेने १२ स्वायत्त महाविद्यालयांना अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा प्रदान केला आहे.
यानुसार आता या अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयांना विद्यापीठ आणि महाविद्यालयाची एकत्रित/सह (Joint Degree) पदवी प्रदान करता येईल. या पदवी प्रमाण पत्रावर विद्यापीठ आणि अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयाचे नाव आणि लोगो असणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या तत्वानुसार अशी महाविद्यालये भविष्यात पदवी बहाल करण्यासाठी मार्गक्रमन करणार आहेत.
अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयांना नवीन प्रमाणपत्र, पदविका, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करणे अधिक सुलभ होणार आहे. त्याचबरोबर विद्यापीठाच्या मंजूरीने पीएचडीचे अभ्यासक्रम सुरु करणे, अभ्यासक्रमांची शुल्क रचना करणे अशा अनुषंगिक बाबींसाठी अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयांना स्वातंत्र्य मिळणार आहे. अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयांत सुरु असलेल्या अभ्यासक्रमांची पूनर्रचना करणे, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नामाभिधानाप्रमाणे अभ्यासक्रमांची नावे बदलणे, मूल्यांकनाची पद्धत विहित करणे, निकाल जाहीर करणे, गुणपत्रक बहाल करणे याचीही मूभा अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयांना मिळणार आहे.
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १२३ मध्ये नमूद अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयाच्या तरतूदीच्या अनुषंगाने स्वायत्त महाविद्यालयांना अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा देण्यासंदर्भात मानके व कार्यपद्धती निश्चित करून महाराष्ट्र शासनातर्फे एकरूप परिनियम २२ मे, २०२३ च्या अधिसूचनेनुसार निर्गमित करण्यात आले.
त्यानुसार मुंबई विद्यापीठाने २३ मे २०२३ रोजी परिपत्रक काढून स्वायत्त महाविद्यालयांकडून अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयाच्या दर्जासाठी अर्ज मागविले होते. विद्यापीठास प्राप्त झालेल्या एकूण १३ अर्जांची रितसर दुबार छाननी करून एकूण १२ स्वायत्त महाविद्यालयांचे अर्ज अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयासाठी पात्र करण्यात आले. सर्व पात्र अर्ज विद्या परिषदेच्या शिफारशीने व्यवस्थापन परिषदेने मान्य केले आहेत.
१) रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, वाशी, नवी मुंबई
२) नगिनदास खांडवाला कॉलेज ऑफ कॉमर्स, आर्ट्स अँड मॅनेजमेंट स्टडीज आणि शांताबेन नगिनदास खांडवाला कॉलेज ऑफ सायन्स, मालाड, मुंबई
३) बिर्ला कॉलेज, कल्याण
४) के.जे. सोमय्या कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स, विद्याविहार
५) सोफिया कॉलेज फॉर वुमन, मुंबई
६) श्री. विलेपार्ले केळवाणी मंडळ मिठीबाई कला महाविद्यालय, चौहान इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आणि अमृतबेन जीवनलाल वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय, विलेपार्ले, मुंबई
७) सेंट झेवियर्स कॉलेज (स्वायत्त), मुंबई
८) हिंदी विद्या प्रचार समितीचे रामनिरंजन झुनझुनवाला कॉलेज, घाटकोपर, मुंबई
९) शिक्षण प्रसारक मंडळीचे रामनारायण रुईया कॉलेज, माटुंगा, मुंबई
१०) जय हिंद कॉलेज, चर्चगेट, मुंबई
११) भवन्स सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (विना अनुदानित), अंधेरी, मुंबई
१२) एसआयईएस कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स, सायन, मुंबई
विद्यापीठ अनुदान आयोग आणि राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार उत्कृष्टताक्षम आणि उच्चस्तरीय दर्जा प्राप्त केलेल्या विद्यापीठाशी सलंग्नित १२ स्वायत्त महाविद्यालयांना शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून पुढील दहा वर्षासाठी अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा देण्यात येत आहे. राज्यात सर्वाधिक ५९ स्वायत्त महाविद्यालये ही मुंबई विद्यापीठाशी संलग्नित असून शैक्षणिक स्वायत्तेकडे मुंबई विद्यापीठाने टाकलेले हे महत्वाचे पाऊल असल्याची प्रतिक्रिया मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी दिली.
'अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयाच्या दर्जासाठी मुंबई विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या स्वायत्त महाविद्यालयांनी सर्वाधिक केलेले अर्ज ही स्वागताहर्य बाब आहे, यामुळे शैक्षणिक क्षेत्रात या महाविद्यालयांचा प्रागतिक दृष्टिकोन दिसून येतो', असे प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे यांनी यावेळी म्हटले.