आदित्य ठाकरेंनी वरळीतून निवडणूक लढवण्यासाठी युवासेनेची पोस्टरबाजी

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवावी ही मागणी जोर धरू लागली आहे.

Updated: Sep 1, 2019, 07:33 PM IST
आदित्य ठाकरेंनी वरळीतून निवडणूक लढवण्यासाठी युवासेनेची पोस्टरबाजी title=

मुंबई : शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवावी ही मागणी जोर धरू लागली आहे. मुंबईच्या वरळी मतदारसंघात यासाठीचे पोस्टर शिवसेनेकडून लावण्यात आले आहेत. 'हीच ती वेळ, नवा महाराष्ट्र घडविण्याची' असा मजकूर या पोस्टर्सवर छापण्यात आला आहे. युवा सेनेनं ही पोस्टर्स लावली आहेत. आदित्य ठाकरेंच्या संभाव्य उमेदवारीसाठी वातावरणनिर्मिती करण्याचा हा प्रयत्न असल्याचं मानलं जातं आहे.

एकीकडे युवासेनेकडून अशी पोस्टरबाजी होत असताना आदित्य ठाकरे यांनी मात्र यावर बोलणं टाळलं आहे. 'निवडणुका लागायला अजून वेळ आहे. ज्यावेळी निवडणुका लागतील, त्यावेळी ठरवू. लोकांचा जो आदेश असेल, तसं मी करेन,' असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. ठाण्यातील आनंद दिघे क्रीडा संकुल येथे आदित्य ठाकरे उद्घाटनासाठी आले होते.

आदित्य ठाकरेंनी निवडणूक लढवावी अशी मागणी शिवसेनेतून करण्यात आली आहे. एवढच नाही तर आदित्य ठाकरे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार,' असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. आदित्य ठाकरे वरळी, माहिम किंवा शिवडी मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.