शिवस्मारकाचा कार्यक्रम रद्द, शिवाजी महाराजांची ती मूर्ती परत आणली

अरबी समुद्रात शिवस्मारकाच्या पायाभरणीसाठी गेलेल्या स्पीड बोटीला अपघात झाल्याने आजचा शुभारंभाचा कार्यक्रम रद्द करावा लागला.

Updated: Oct 24, 2018, 07:47 PM IST
शिवस्मारकाचा कार्यक्रम रद्द, शिवाजी महाराजांची ती मूर्ती परत आणली title=

मुंबई : अरबी समुद्रात शिवस्मारकाच्या पायाभरणीसाठी गेलेल्या स्पीड बोटीला अपघात झाल्याने आजचा शुभारंभाचा कार्यक्रम रद्द करावा लागला. यावेळी शुभारंभानंतर शिवाजींची एक छोटीशी मूर्ती तिथे बसवणार होते...मात्र कार्यक्रम रद्द झाल्यानंतर ती मूर्ती पुन्हा आणण्यात आली. गेट वे ऑफ इंडिया इथे ही शिवरायांची मूर्ती पुन्हा आणण्यात आली.

शिवस्मारकाच्या पायाभरणीच्या शुभारंभाला अपघाताचं गालबोट लागलंय. शुभारंभासाठी तीन बोटी नियोजित स्मारकाच्या दिशेनं निघाल्या होत्या. मात्र एका बोटीचा चालक अतिशय वेगानं बोट चालवत होता. या बोटीत २५ जण होते. मात्र वेगानं जाणाऱ्या या बोटीवरील नियंत्रण सुटल्यानं ही बोट खडकावर आदळली.

बोट तुटल्यामुळे बोटीत पाणी शिरलं आणि सर्वांनी आपापले प्राण वाचवण्यासाठी धावपळ केली. मात्र या अपघातात बीडचा तरुण सिद्धेश पवार बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या बोटीत असलेले प्रवासी आणि अधिकारी श्रीनिवास जाधव यांनीही एक जण बुडाल्याची भीती व्यक्त केलीय.

या बोटीला अपघात झाल्यानंतर श्रीनिवास जोशी य़ांनी शेकापचे अध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांना संपर्क केला. त्यानंतर जयंत पाटलांनी मदतीसाठी काही बोटी अपघातस्थळी पाठवल्या. बोटीत कोणत्याही प्रकारचे जीवरक्षक आणि लाईफ जॅकट नव्हते असा आरोप काही प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी केली आहे. मात्र या सर्व बोटींमध्य़े सुरक्षेच्या सर्व सोयी असल्याचा दावा शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केलाय.

थरकाप उडवणारा हा प्रसंग होता. बोटीत बसलेले प्रवासी जीव मुठीत घेऊन बसलेले होते. या सर्वांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी हेलिकॉप्टर्सना पाचारण करण्यात आलं होतं.