मुंबई शेअर बाजारात मोठी उसळी, सेन्सेक्स ३८ हजारांवर

शेअर बाजारात आज तेजी पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने (सेन्सेक्स) आज ऐतिहासिक उसळी घेतल्याचे पाहायला मिळाले. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 9, 2018, 07:43 PM IST
मुंबई शेअर बाजारात मोठी उसळी, सेन्सेक्स ३८ हजारांवर title=

मुंबई : शेअर बाजारात आज तेजी पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने (सेन्सेक्स) आज ऐतिहासिक उसळी घेतल्याचे पाहायला मिळाले. शेअर बाजारामध्ये बुधवारी विक्रमी तेजी होती. आज देखील ही तेजी कायम आहे. आज सकाळी मार्केट सुरू होताच इतिहासात पहिल्यांदाच सेन्सेक्स ३८ हजारांवर पोहोचला. निफ्टीनेही पहिल्यांदाच ११४९५ ची पातळी गाठली. सेन्सेक्सची आतापर्यंतची ही सर्वोच्च कामगिरी ठरली.

बँकिंग, वित्तीय सेवा आणि रियल्टी समभागांमधील प्रचंड खरेदीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी विक्रमी तेजी दिसून आली. हेवीवेट्स आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक, इन्फोसिस, एसबीआय, आयटीसी समभाग खरेदीत मोठी वाढ झाली. त्यामुळे शेअर बाजाराला अधिक पाठिंबा मिळाला.

 नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टी पहिल्यांदाच ११,४०० अंकांपेक्षा वरच बंद झाला असून, बुधवारी ६०.५५ अंकांची कमाई झाली.  सकाळच्या सत्रामध्ये आयसीआयसीआय आणि अॅक्सिक बँकेच्या शेअर्सची सर्वाधिक खरेदी झाली आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीकोनाने उचललेल्या पावलांमुळे बाजारात तेजी पाहायला मिळत असल्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. 

शेअर बाजारातील तेजीचा परिणाम रुपयावर झाला आहे. डॉलरच्या तुलनेत १४ पैशांनी रुपया बळकट झाला आहे. या आठवड्याच्या चौथ्या दिवशी आशियाच्या बाजारांमध्ये सर्वत्र तेजी पाहायला मिळत आहे. जपानव्यतिरिक्त सर्वत्र शेअर बाजारामध्ये तेजीचं वातावरण असल्याचे दिसून येत आहे. या विक्रमी उंचीने शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.