मुंबई : मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाज हैदराबाद स्टेटमध्ये असताना कुणबी गणला जायचा. मात्र महाराष्ट्रात आल्यावर तो मराठा म्हणून गणला जाऊ लागला, असा दावा भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलाय. आज राज्यात पुन्हा पेटलेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या विधानाला महत्त्व प्राप्त झालंय. मराठवाड्यातल्या मराठ्यांना जुना दर्जा पुन्हा दिला गेला, तर आरक्षण मिळणं शक्य होईल, असं दानवेंचं म्हणणं आहे. याबाबत न्यायालयात बाजू मांडणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय.
मराठा आरक्षणाच्या मागणीवरून आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. सकाळपासून शांततेत सुरूवात झालेल्या आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागले. वाळूज भागातही जमाव आक्रमक झाला. जमावाला रोखण्यासाठी पोलिसांना हवेत अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडव्या लागल्या. जमाव पांगविण्यासाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज केला. यावेळी संतप्त आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याचे समोर आलंय. यामध्ये एक खाजगी बस आणि १ पोलीस व्हॅन आंदोलनकर्त्यांनी जाळल्याचे सांगण्यात येतंय.