'नापास' झाल्यानं आत्महत्या करणारी रिद्धी पास

रिद्धी ग्रॅज्युएशनच्या तिसऱ्या वर्षी, एका विषयात नापास झाली

Updated: Oct 26, 2018, 09:29 PM IST
 'नापास' झाल्यानं आत्महत्या करणारी रिद्धी पास title=

सुस्मिता भदाणे, झी मीडिया, मुंबई : मुंबई विद्यापीठात शिकत असलेल्या रिद्धी परब या विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीला आलीय. रिद्धी ग्रॅज्युएशनच्या तिसऱ्या वर्षी, एका विषयात नापास झाली, आणि रिद्धीचं सीए होण्याचं स्वप्न भंगलं. अखेर नैराश्यात तिने जीवनच संपवलं. रिद्धीच्या पालकांनी नंतर पुर्नमुल्यांकन अर्ज भरला. धक्कादायक म्हणजे या निकालात रिद्धी पास असल्याचं निष्पन्न झालं पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. 

यानंतर तिच्या पालकांनी एका प्रकारे मुंबई विद्यापीठ आणि कुलगुरूच रिद्धीच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा आरोप केलाय.

विद्यापीठाने केली हत्या 

'आपण सर्व म्हणतोय रिद्धीची ही आत्महत्या आहे पण खर पाहता ही विद्यापीठाने केलेली हत्या आहे. तिला सीए होण्याची ईच्छा होती. पण विद्यापीठाने या पद्धतीने निकाल लावल्याने रिद्धीने धक्का घेतला' असं तिच्या वडिलांनी सांगितलं. 

'मी चांगल्या गुणांनी पास होणार असल्याचं रिद्धी निकालाआधी सांगत होती. तिच्या निधनानंतर आम्ही तिचा पेपर पुनरमुल्यांकनासाठी पाठवला. यामध्ये तिला 12 गुण वाढल्याचे दिसून आले. पास होऊनही त्यावर तिचे गुण आहेत. हा निकाल जर आधी तिला कळाला असता तर तिचा जीव वाचला असता' असंही ते म्हणाले. 

आम्ही पद्धत बदलू, नियम बदलू असं कुलगुरूंनी आम्हाला सांगितलं पण रिद्धीचा गेलेला जीव आम्हाला परत मिळणार नाही असं रिद्धीच्या आईने सांगितलं.