Mumbai News : मुंबईला दहशतवाद्यांची पुन्हा एकदा उडवून देण्याची धमकी

मुंबईवरील  26/11च्या  हल्ल्याला 14 वर्ष लोटलीयेत. मात्र मुंबई अजूनही सुरक्षित नाही. आता पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी मुंबईला उडवून देण्याची धमकी दिलीय.

Updated: Aug 20, 2022, 11:47 PM IST
Mumbai News : मुंबईला दहशतवाद्यांची पुन्हा एकदा उडवून देण्याची धमकी title=

मुंबई : मुंबईला हादरवून सोडणारी बातमी. मुंबईला उडवून देण्याची धमकी आलीय. मुंबई पोलिसांना पाकिस्तानातून हा धमकीचा मेसेज आलाय. या मॅसेजमध्ये उल्लेख केलेल्या सहा जणांपैकी एकाला विरारमधून ताब्यात घेण्यात आलंय. या धमकीनंतर मुंबईसह राज्यातली सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आलीय. काय आहे दहशतवाद्यांचा प्लॅन? कुणी दिलीय मुंबई उडवण्याची धमकी? (mumbai police receives messages threatening 2611 like attack)

मुंबईवरील  26/11च्या  हल्ल्याला 14 वर्ष लोटलीयेत. मात्र मुंबई अजूनही सुरक्षित नाही. आता पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी मुंबईला उडवून देण्याची धमकी दिलीय. या दहशतवाद्यांनी थेट मुंबई पोलीस कंट्रोल रूमला व्हॉट्स अॅप मेसेज करत हल्ला करण्याचा इशारा दिलाय.

जी मुबारक, मुंबईवर दहशतवादी हल्ला करणार आहोत. 26/11 दहशतवादी हल्ल्याची आठवण येईल. मुंबईला उडवून देण्याची तयारी करत आहोत. मी पाकिस्तानातून आहे, पण तुमचे काही भारतीय माझ्यासोबत आहेत, हे भारतीय देखील मुंबई उडवण्यासाठी उत्सुक आहेत असं या मेसेजमध्ये म्हंटलंय. 

उदयपूरसारखंही कांड होऊ शकतं, धडापासून मुंडकं तोडून टाकू, पंजाबच्या सिद्धू मुसेवालासारखं हत्याकांडही करू, अमेरिकेतला प्रकारही विसरू नका तुम्हाला तारीख लवकरच कळेल.  आणखी एक ओसामा, आणखी एक अजमल कसाब तयार होईल. एक अल जवाहिरी मारलात, आणखी किती तरी जवाहिरी तयार होतील. ही केवळ धमकी नाही, आम्ही करून दाखवू, आमचं लोकेशन तुम्हाला इथलं दिसत असलं तरी कारवाई मुंबईत होईल. अशी धमकी या दहशतवाद्यांनी दिलीय. 

या धमकीनंतर सुरक्षायंत्रणा अलर्ट मोडवर आलीय. मुंबईसह राज्यभरात सतर्कतेचे आदेश देण्यात आलेत. महत्वाच्या ठिकाणांवर नाकाबंदी करण्यात आलीय. 

झी 24 तासनं या धमकीच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला. ज्या नंबरवरून मुंबई पोलिसांना फोन आला त्या नंबरवर झी न्यूजचे प्रतिनिधी अश्विनी कुमार पांडे यांनी संपर्क साधला. त्यावेळी हा फोन नंबर लाहोरमधल्या मोहम्मद इम्तियाज नावाच्या व्यक्तीचा असल्याचं समोर आलं.

असं असलं तरी गेल्या तीन दिवसांत दहशदवाद्यांशी संबंधित तीन घडामोडी समोर आल्यायेत. गुरूवारी रायगडच्या हरिहरेश्वर समुद्रकिनारी शस्त्रास्त्रांनी भरलेली संशयास्पद बोट आढळून आली. या बोटीत तीन AK-47 रायफल्स आणि काडतुसं सापडलीयेत. एनआयए आणि एटीएसकडून बोटीचा तपास सुरूंय. 

तर दुसरीकडे टेरर फंडिंगप्रकरणी मोहम्मद यासीन या हवाला एजंटला दिल्लीतून अटक करण्यात आलीय. त्यानं काश्मीरमधील पाकिस्तानी दहशतवाद्यांना 10 लाख पुरवल्याचं समोर आलंय. त्यानंतर आता मुंबई उडवून देण्याची धमकी. या सगळ्या घडामोडी लक्षात घेता पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून मोठ्या घातपाताचा कट तर रचला जात नाही ना? अशी भीती व्यक्त होणं स्वाभाविक आहे.