पोलिसांनो काळजी घ्या... तुम्ही सुरक्षित तर आम्ही सुरक्षित!

मुंबई वाहतूक विभागात कार्यरत असलेले पोलीस अधिकारी एसीपी दिलीप शिंदे यांचा मंगळवारी संध्याकाळी होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झालाय. एका पोलीस अधिकाऱ्याचा स्वाईन फ्लूमुळे झालेल्या मृत्यूमुळे मुंबई पोलीस दलात खळबळ उडालीय.

Updated: Jul 12, 2017, 07:38 PM IST
पोलिसांनो काळजी घ्या... तुम्ही सुरक्षित तर आम्ही सुरक्षित! title=
एसीपी दिलीप शिंदे

अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई : मुंबई वाहतूक विभागात कार्यरत असलेले पोलीस अधिकारी एसीपी दिलीप शिंदे यांचा मंगळवारी संध्याकाळी होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झालाय. एका पोलीस अधिकाऱ्याचा स्वाईन फ्लूमुळे झालेल्या मृत्यूमुळे मुंबई पोलीस दलात खळबळ उडालीय.

गेल्याच आठवड्यात मुंबई पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत सुर्यवंशी यांचा देखील स्वाइन फ्लूने मृत्यू झाला होता. त्यामुळे आता स्वाइन फ्लूने मुंबई पोलीस दलावर हल्ला केलाय का? असा प्रश्न निर्माण झालाय.

स्वाईन फ्लूचा मुंबई पोलिसांवर हल्ला

मुंबई वाहतूक विभागातील एक कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेले एसीपी दिलीप शिंदे... वरळी वाहतूक विभागात दिलीप शिंदे हे प्रशासन विभाग प्रमुख होते. ७ जुलैला दिलीप शिंदे यांना अचानक ताप भरुन आला आणि त्यांना बांद्र्याच्या होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आलं आणि तिथे त्यांना निमोनिया झाल्याचे निष्पन्न झाले. पण ११ जुलैला संध्याकाळी त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांचा मृत्यू झाला. मेडीकल चाचणीत दिलीप शिंदेचा मृत्यू हा स्वाइन फ्लू ने झाल्याचं स्पष्ट झालं.

पोलीस दलातील खबरदारीचा इशारा

सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप शिंदे हे मूळचे सोलापूरचे होते.  दिलीप शिंदें प्रमाणेच ६ जुलैला गोराई पोलीस स्टेशनचे एएसआय चंद्रकांत सुर्यवंशी यांचादेखील स्वाईन फ्लूने मृत्यू झाला होता. स्वाइन फ्लूमुळे एकाच आठवड्यात पोलीस दोन अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याने मुंबई पोलीस दलात हळहळ व्यक्त केला जातेय तर पोलीस दलात आता विविध आजारांनी पोलिसांचे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढलंय.

२०१७ साली एकूण ७२ मुंबई पोलीसांचे विविध आजाराने मृत्यु झाले आहेत.

हार्ट अटॅक - १७

दिर्घ आजार - ३८

अपघाती मृत्यू - ०३

लिव्हर / काविळ - ०३

क्षयरोग - ०१

कर्करोग - ८

स्वाईन फ्लू - २

 
एसीपी दिलीप शिंदे आणि एएसआय चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या मृत्यूमुळे पोलिसांच्या आरोग्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. पण 'झी २४ तास' तमाम पोलिसांना विनंती करत आहे. तुमच्यामुळे आम्ही सुरक्षित आहोत पण तुम्ही आपल्या तब्येतीची काळजी घ्या, वेळीच वैद्यकीय तपासण्या करा... कारण तुम्ही तंदुरूस्त तर आम्ही सुरक्षित...