South Mumbai Water Supply Closed : उकाड्याने हैराण असलेल्या मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दक्षिण मुंबईत दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहाणार आहे, असं मुंबई महापालिकेकडून सांगण्यात आलंय. 6 आणि 7 जूनला मुंबईतील जी दक्षिण विभाग म्हणजे करी रोड, डिलाईल रोड, लोअर परळ या भागातील पाणीपुरठा बंद असणार आहे. 6 आणि 7 जूनला या भागातील जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार आहे. या जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी 17 तासांचा कालावधी लागणार असल्याने दोन दिवस पाणीपुरवठा बंद असणार आहे.
मुंबई महापालिकेच्या माहितीनुसार रेसकोर्स इथे प्रत्येकी 1 हजार 450 व्यासाच्या तानसा (पूर्व) आणि तानसा (पश्चिम) या प्रमुख जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. तर 6 जूनला रात्री 9:45 पासून 7 जून दुपारी 3 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा साठा करुन ठेवावा तसंच पाण्याचा वापर काटकसरीनं करावा असं आवाहन बीएमसीकडून करण्यात आलंय.
या कामामुळे जी दक्षिण विभागातील करी रोड, सखाराम बाळा पवार मार्ग, महादेव पालव मार्ग, डिलाईल रोज, बीडीडी चाळ, लोअर परळ या परिसरांतील पाणीपुरवठ्यावर सर्वाधिक परिणाम होणार आहे.