Mumbai News : मुंबईकरांच्या आयुष्यावर शहरातील लहानमोठे नियम परिणाम करताना दिसतात असाच एक नियम नुकताच लागू करण्यात आला आहे. जिथं मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेनं (Mumbai Traffic Police )नागरिकांना सतर्क केलं असून, त्यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. या नियमांचं पालन न करणाऱ्यांवर वाहतूक शाखेतील पोलीस कारवाईसुद्धा करणार आहेत. त्यामुळं मुंबईकरांनो शहरात प्रवास करताय? तर आधी हा नियम लक्षात ठेवा.
9 ऑगस्ट (आज) आणि 16 ऑगस्ट हे दोन दिवस मुंबईत 'नो हॉंकींग डे' म्हणून पाळण्यात येणार आहेत. वाढत्या ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी म्हणून हे पाऊल उचलण्यात आलं आहे.
मुंबई वाहतूक पोलिसांनी विनाकारण हॉर्न वाजवणाऱ्यांविरोधात कारवाईचं पाऊल उचलल्याचं या मोहिमेतून स्पष्ट होत आहे.
Mumbai will be observing No Honking Day on 9th August (Wednesday) & 16th August in an attempt to reduce the growing trend of unnecessary honking.
Honking significantly contributes to noise pollution and health problems. #NoHonkingDay#HornFreeMumbai pic.twitter.com/T70NS4VeBq— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) August 8, 2023
सदरील नियमाबाबतची माहिती देणारं एक पत्रक मुंबई पोलिसांनी जारी केलं ज्यामध्ये त्यांनी काही गोष्टी नमूद करत कारवाईचं स्वरुपही उघड केलं. या पत्रकामध्ये मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेतून म्हटलं गेलं, 'विनाकारण हॉर्न वाजवण्यामुळं ध्वनी प्रदूषण होतं आणि याचा आरोग्यावरही परिणाम होत असल्याचं पाहायला मिळालं आहे. परिणामी मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेनं 9 आणि 16 ऑगस्ट रोजी No Honking Day पाळण्याचं ठरवलं आहे.'
दरम्यानच्या काळात दुचाकीस्वार आणि इतर वाहन धारकांनी त्यांच्या वाहनांचे हॉर्न आणि सायलेन्सर वाहतूक नियमांच्या अनुषंगानं असल्याची खात्री करून घ्यावी. अन्यथा विनाकारण हॉर्न वाजवणाऱ्यांवर वाहतूक कायदा 194 (एफ) अंतर्गत कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे. ज्यांनी त्यांच्या वाहनांचे सायलेन्सर आणि एक्स्झॉस्ट बदलून घेतले आहेत त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात येईल. फक्त हे दोन दिवसच नव्हे, तर वाहनधारकांनी या नियमाचं नेहमीच पालन करावं असं आवाहनही वाहतूक शाखेकडून करण्यात येत आहे.