'आदित्य ठाकरेंमुळे सामान्य जनतेचे 10 हजार कोटींचे नुकसान'; मनीषा कायंदेंचा गंभीर आरोप

गेल्या कित्येक महिन्यांपासून बंद असलेल्या बहुप्रतीक्षित डिलाईल पुलाचे उद्घाटन करणाऱ्या आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर मुंबई पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. यावरुन आता चांगलेच राजकारण तापलं आहे.

आकाश नेटके | Updated: Nov 18, 2023, 01:42 PM IST
'आदित्य ठाकरेंमुळे सामान्य जनतेचे 10 हजार कोटींचे नुकसान'; मनीषा कायंदेंचा गंभीर आरोप title=

गणेश कवडे, झी मीडिया, मुंबई  : माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना मुंबईतील लोअर परेल भागात असलेल्या बहुप्रतीक्षित डिलाईल ब्रिजचे (Delisle Bridge In Lower Parel ) परस्पर उद्घाटन केल्यानंतर राजकारण चांगलेच तापले आहे. या उद्घाटनानंतर आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार सुनिल शिंदे, सचिन अहिर आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे शिंदे गटाच्या आमदार डॉ. मनीषा कायंदे (manisha kayande) यांनी या सगळ्या प्रकारावरुन आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

आदित्य ठाकरे यांच्यासह काही नेत्यांनी 16 नोव्हेंबर रोजी लोअर परळ येथील डिलाईल ब्रिजचं उद्घाटन केलं होतं. कोणत्याही परवानगीशिवाय हा पूल प्रवाशांसाठी खुला केल्याने आदित्य ठाकरे यांच्यासह काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदित्य ठाकरे, सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांच्याविरुद्ध एनएम जोशी पोलीस ठाण्यात आयपीसीच्या कलम 143, 149, 326 आणि 447 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी फिर्याद दाखल केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावरुन आता आमदारा मनीषा कायंदे यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. "मेट्रो कारशेडचे काम आदित्य ठाकरेंमुळे रखडल्याने सर्व सामान्य जनतेचे 10 हजार कोटींचे नुकसान झाले आहे, त्यामुळे त्यांनी जनतेचे कैवारी असल्याचा खोटा कांगावा मुळीच करू नये. आदित्य ठाकरे मोठ्या बापाचा बिघडलेला मुलगा. राजकारणात स्वतःची छाप सोडा, फक्त मिडियासाठी राजकारण करू नका," असे आमदार डॉ मनीषा कायंदे यांनी म्हटलं आहे.

"पुलाचे काम अद्याप बाकी असताना उबाठा पक्षाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी लोअर परेल येथील डिलाइल पुलाचे जबरदस्तीने उद्घाटन करण्याचा प्रयत्न केला. का, तर तो ब्रिज त्यांच्या मतदारसंघात येतो म्हणून. आजपर्यंत आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या मतदारसंघात स्वतःचे जनसंपर्क कार्यालय सुद्धा उघडले नाही आणि ते आज जनतेचे कैवारी असल्याचा कांगावा करत आहेत. यातून ते किती वैफल्यग्रस्त झाले आहेत हे स्पष्ट होते," अशी परखड टीका शिवसेनेच्या सचिव आणि प्रवक्त्या आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी केली.