IIT Bombay : आयआयटी मुंबई, एक मानाची शैक्षणिक संस्था जिथं शिक्षण घेऊन उज्ज्वल भवितव्याची स्वप्न अनेकजण पाहता. बऱ्याचजणांना ती संधीही मिळते आणि पुढं जाऊन त्याच संधीच्या बळावर ही मंडळी थक्क करणारी कामगिरी करतात. अशा या IIT Bombay चं नाव एकाएकी अनपेक्षित कारणामुळं प्रकाशझोतात आलं आहे. या शैक्षणिक संस्थेला सहसा देणगी देणाऱ्यांचा आकडा सहसा मोठा असतो. पण, पहिल्यांदाच या शैक्षणिक संस्थेला तब्बल 160 कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे. देणगी देणाऱ्या व्यक्तीनं त्याच्या नावाचा खुलाला केला नसल्यामुळं आता इतकी मोठी रक्कम कोणी दिली हाच कुतूहलाचा प्रश्न सर्वांना पडत आहे.
IITB मधील काही वरिष्ठ पदांवरील सदस्यांनी मंदिरातील देणगीशी याचा संबंध जोडत आश्चर्य व्यक्त केलं. आपल्याकडे इतक्या मोठ्या स्वरुपातील देणगी पहिल्यांदातच आल्याचं संचालक शुभाशिष चौधरी यांनी आश्चर्य व्यक्त केलं. 'हे सर्व USA मध्ये अगदी सर्वसामान्य आहे. मला नाही वाटक की, भारतातील कोणत्याही विद्यापीठाला अशा प्रकारची सदिच्छा भेट मिळाली असेल जिथं देणगीदाराचा चेहराच प्रकाशझोतात आला नसेल', असंही ते म्हणाले. इथं देणगीदारांना त्यांनी दिलेली रक्कम सद्कारणी वापरली जाईल यावर विश्वास असल्याचं वक्तव्यही केलं.
इथं लक्ष वेधण्याजोगी बाब म्हणजे ज्यावेळी ही शैक्षणिक संस्था काहीशा आर्थिक संकटांचा सामना करत होती, Higher Education Financial Agency (HEFA) कडून संस्थेच्या विकासासाठी कर्ज घेऊ पाहात होती तेव्हाच ही कोट्यवधींची मदत करण्यात आली. सध्याच्या घडीला मदतीसाठीची ही रक्कम आयआयटी मुंबईच्या आवारात Green Energy आणि Sustainability Research hub (GESR) सुरु करण्यासाठी वापरण्यात येईल. तर, रकमेचा काही भाग नव्या बांधकामासाठी वापरला जाईल आणि काही भाग संशोधनपर कामांसाठी राखीव ठेवण्यात येईल. राहिला मुद्दा ही इतकी मोठी रक्कम देणगी स्वरुपात कोणी दिली तर, संस्थेकडे या रकमेचा एक चेक आला असून, तो संस्थेतील माजी विद्यार्थ्यांकडून असल्याचं म्हटलं जात आहे. ज्यांनी त्यांचं नाव समोर न येण्याची अट पुढे केली होती.
ग्रीन एनर्जी अँड सस्टेनेबिलिटी रिसर्च हबमध्ये विविध प्रकारचं संशोधन करण्यात येईल. यामध्ये बॅटरी तंत्रज्ञान, सोलर फोटोव्होलटाईक्स, बायोफ्युएल, क्लिन एअर सायन्स, फ्लड फोरकास्टींत आणि कार्बन कॅप्चरवरील संशोधन पार पडेल.