Mumbai Coastal Road : घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबई शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा मानस नेतेमंडळींनी उराशी बाळगत अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची पायाभरणी शहरात केली. त्यापैकी काही प्रकल्प पूर्णत्वास गेले, तर काही प्रकल्प पूर्णत्वास जाण्याआधीच निवडणुका तोंडावर असल्यामुळं त्यांचं टप्प्याटप्प्यानं लोकार्पण करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबईत नव्यानं बांधण्यात आलेला किनारी रस्ता अर्थात कोस्टल रोडही त्यापैकीच एक.
शहरातील सागरी किनाऱ्याला लागून आणि काही भागांमध्ये चक्क समुद्राच्या पोटातून जाणाऱ्या या रस्त्याचं उदघाटन रविवारी झालं आणि या लखलखणाऱ्या शहराला जोडणारा आणखी एक रस्ता प्रवाशांच्या, शहरातील नागरिकांच्या आणि शहरात येणाऱ्या प्रत्येकाच्याच सेवेत आला. सोमवारपासून वाहनांसाठी खऱ्या अर्थानं हा कोस्टल रोड सुरू झाला असून, पहिल्याच दिवशी काही वाहनधारकांचा हिरमोडही झाला आहे. कारण, या कोस्टल रोडवरून प्रवास करण्यापूर्वीच काही वाहनांना या वाटेवर प्रवेशबंदीला सामोरं जावं लागत आहे.
वेगमर्यादा आणि वाहतुकीच्या इतर नियमांमध्ये एक महत्त्वाची भर म्हणजे कोस्ट रोडवर प्रवेश निषिद्ध असणाऱ्या वाहनांची यादी. सरसकट सर्व वाहनांना या वाटेनं प्रवेश न देता काही वाहनांना या मार्गावर प्रवेश नाकारण्यात आल्याचं सुरुवातीलाच स्पष्ट करण्यात आलं आहे.