भारत जोडो न्याय यात्रा मंगळवारी महाराष्ट्रात, उद्धव ठाकरे, शरद पवार उपस्थित रहाणार?

Bharat Jodo Nyay Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा उद्या नंदूरबारमधून महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. 17 तारखेला शिवाजी पार्कवरील सभेने यात्रेची सांगता होणार असून लोकसभा प्रचाराचा नारळ फोडला जाणार आहे. 

राजीव कासले | Updated: Mar 11, 2024, 07:53 PM IST
भारत जोडो न्याय यात्रा मंगळवारी महाराष्ट्रात, उद्धव ठाकरे, शरद पवार उपस्थित रहाणार? title=

मुंबई : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो न्याय यात्रा (Bharat Jodo Nyay Yatra) मंगळवारी म्हणजे 12 मार्चला दुपारी 2 वाजता नंदूरबार जिल्ह्यातून महाराष्ट्रात (Maharashtra) प्रवेश करणार आहे.  13 मार्चला धुळे, मालेगाव, 14 मार्चला नाशिक, 15 मार्च रोजी पालघर, ठाणे असा प्रवास करत ही यात्रा 16 मार्चला मुंबईत दाखल होणार आहे. 17 मार्चला भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप शिवाजी पार्कवर (Shivaji Park) होत असून याचवेळी इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha 2024) प्रचाराचे रणशिंग फुंकलं जाणार आहे. 

भारत जोडो न्याय यात्रेची सुरुवात 15 जानेवारीला मणिपूरमधून करण्यात आली असून यात्रेची सांगता मुंबईत होणार आहे. ही यात्रा 15 राज्यं, 100 जिल्हे, 110 लोकसभा मतदारसंघातून 67 दिवसांत 6700 किमीचा प्रवास केला आहे. 'भारत जोडो न्याय यात्रा, न्याय का हक मिलने तक' या घोषवाक्यासह ही यात्रा मार्गक्रमण करत आहे. गेल्या वर्षी राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर अशी 4000 किमीची पदयात्रा काढली होती. या यात्रेला जनतेचं प्रचंड समर्थन लाभलं होतं. आता भारत जोडो न्याय यात्रेलाही जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

भारत जोडो न्याय यात्रेसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने जय्यत तयारी केली असून मुंबईत राहुल गांधी आणि न्याय यात्रेचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. यात्रेला आणि शिवाजी पार्क वरील जाहीर सभेला प्रचंड मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रदेश काँग्रेसकडून करण्यात येत आहे.

शरद पवार, उद्धव ठाकरे उपस्थित राहाणार
शिवाजी पार्क इथं 17 मार्च रोजी होणाऱ्या सभेला शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) उपस्थित राहणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपवेळी इंडिया आघाडीची एक मोठी सभा या निमित्ताने शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे.  यासाठी राज्यातील काँग्रेस नेत्यांकडून आज उद्धव ठाकरेंना भारत जोडो यात्रेला उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण देण्यात आलं. शिवाय महाविकास आघाडीतील सर्व महत्त्वाच्या नेत्यांनाही काँग्रेसच्या वतीने निमंत्रण देण्यात येणार आहे

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यानिमित्ताने मोठं शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे.