Mumbai Coastal Road Phase 2 News : वांद्रे- वरळी सी लिंकची बांधणी झाल्यानंतर त्यावरून प्रवास करताना कायमच अनेकांच्या मनात भारावल्याची भावना घर करून जात होती. शहराच्या सौंदर्यासह रस्ते वाहतुकीमध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या या सी लिंकप्रमाणं अनेक उड्डाणपूल, फ्री वे, अटल सेतू या आणि अशा बऱ्याच प्रकल्पांनी खऱ्या अर्थानं शहरातील नागरिकांचा प्रवास अधिक सुकर केला. त्यातच आता कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्याचीसुद्धा भर पडणार आहे. (Coastal Road Phase 2)
2024 या वर्षाच्या सुरुवातीला अटल सेतूचं लोकार्पण पार पडलं आणि त्यामागोमागच कोस्टल रोडचा पहिला टप्पाही प्रवाशांसाठी खुला करण्यात आला. त्यानंतर आता याच सागरी किनारा मार्ग अर्थात कोस्टल रोडचा आणखी एक टप्पा प्रवाशांच्या सेवेत येणार असून, सोमवार, 10 जून 2024 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुसऱ्या टप्प्यावरील मार्गिकेची पाहणी केल्यानंतर मंगळवारपासून नागरिकांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या कोस्टल रोड प्रकल्पातील मरीन ड्राईव्ह पासून सुरू होणारा दुसरा भूमिगत बोगदा वाहतुकीसाठी सुरु केला जाईल.
कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्याच्या उपलब्धतेमुळं मुंबईतील मरीन ड्राईव्ह ते हाजी अली असा एकूण 6.25 Km अंतराचा हा बोगदा अवघ्या 10 मिनिटांमध्ये पाक करता येणार आहे. ज्यामुळं शहरातून प्रवास करणाऱ्यांना आता प्रवासातील बराच वेळ वाचवता येणार असून, वाहतूक कोंडीतून त्यांची सुटकाही होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
कोस्टल रोडचा दुसरा टप्पा वाहतुकीसाठी 24 तास खुला नसेल याची प्रवाशांनी नोंद घ्यावी. मिळालेल्या माहितीनुसार आठवड्यातील एकूण पाच दिवस म्हणजे सोमवार ते शुक्रवारदरम्यान सकाळी 7 ते सायंकाळी/ रात्री 11 वाजेपर्यंत म्हणजेच एकूण 16 तास हा बोगदा वाहतुकीसाठी खुला असेल. शनिवार आणि रविवार या प्रकल्पातील उर्वरित काम आणि देखभालीचं काम करण्यात येणार आहे. दरम्यान, कोस्टल रोडच्या या दुसऱ्या टप्प्यामुळं वरळी, वांद्रे, ताडदेव, पेडर रोड इथे जाणाऱ्या वाहतुकीला वेग मिळणार आहे.