Bmc Rat Scam | मुंबई महापालिकेत उंदीर घोटाळा? शिवसेना-भाजप आमनेसामने

मुंबई महानगरपालिकेत (Mcgm) सध्या एक घोटाळा (Bmc Rat Scam) चांगलाच गाजतोय.  

Updated: Feb 12, 2022, 10:00 PM IST
Bmc Rat Scam | मुंबई महापालिकेत उंदीर घोटाळा? शिवसेना-भाजप आमनेसामने title=
प्रातिनिधिक छायाचित्र

कृष्णात पाटील, झी 24 तास मुंबई :  मुंबई महानगरपालिकेत (Mcgm) सध्या एक घोटाळा (Bmc Rat Scam) चांगलाच गाजतोय. उंदीर मारण्यासाठी मुंबई महापालिकेनं तब्बल 1 कोटी रूपये उडवल्याचा आरोप भाजपनं केलाय. त्यावरून सत्ताधारी शिवसेना आणि विरोधी भाजप पुन्हा एकदा आमने सामने आलेत. (mumbai municipal corporation rat scam for 1 crore rupees bjp alleges)

मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाऱ्यांचा सुळसुळाट?

अनेक वर्षांपासून मुंबईत रात्रीच्या वेळी महापालिकेच्या किटकनाशक विभागाकडून उंदीर मारण्याचं काम केलं जातं. तसं हे दुर्लक्षित असलेलं उंदीर मारण्याचं काम आता अचानक प्रकाशझोतात आलंय, ते या कामांत झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे.

मुंबईतल्या पाच प्रभागांमध्ये उंदरांचा खात्मा करण्यासाठी एक कोटी रूपये खर्च करण्यात आलेत. मात्र या एक कोटी रूपयांमध्ये किती उंदीर मारण्यात आले याचा उल्लेख नाही. यावरून भाजपनं सत्ताधाऱ्यांविरोधात कंबर कसली आहे.

सध्याच्या घडीला एक उंदीर मारण्यासाठी 20 रूपये दर ठरवून देण्यात आलाय. ठरवून दिलेल्या संख्येपेक्षा जास्त उंदीर मारल्यास प्रत्येक उंदरामागे 22 रूपये दिले जातात. मात्र 1 कोटीच्या कामात मेलेल्या उंदरांची आकडेवारीच नाही. त्यामुळे या प्रकरणात भ्रष्टाचाराची दुर्गंधी येणं स्वाभाविक आहे.

या आरोपांनंतर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाला सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देश देत हा प्रस्ताव राखून ठेवलाय. महापौर किशोरी पेडणेकर यांनी मात्र आरोप करणा-यांच्या घरी मारलेले उंदीर पाठवून हिशोब देणार असल्याचं सांगितलंय.

पालिका निवडणूक जवळ येत असताना आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही वाढल्यात. मात्र यानिमित्तानं भ्रष्टाचार करताना उंदरांनाही सोडलं नसल्याचं दिसतंय. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.