देवेंद्र कोल्हटकर, झी 24 तास, मुंबई: मुंबई राहणारे नागरिक दरमहिन्याला पाणी, जमीन, वीजेचा कर भरत असतात. मुंबई पालिका यावर नियंत्रण ठेवते. कर न भरलेल्यांना नोटीस पाठवते. वेळप्रसंगी कनेक्शन बंदही करण्यात येते. दरम्यान मुंबई पालिका आयुक्तांची 14 वर्षांची कर थकबाकी असल्याचे समोर आले आहे. काय घडलाय प्रकार? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
मुंबई महापालिका प्रशासनाच्या कर निर्धारण आणि संकलक विभागाने मालमत्ता कर वसुलीसाठी कठोर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. पण पालिका आयुक्त बंगल्याची मागील 14 वर्षाची कर थकबाकी 4.56 लाख आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस दिलेल्या माहितीतून ही बाब समोर आली आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी आयुक्त कार्यालयाकडे 29 डिसेंबर 2023 रोजी अर्ज केला होता. या अर्जाद्वारे बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी आपल्या बंगल्यावर वीज सुविधांसाठी केलेला खर्चाबाबत माहिती मागवण्यात आली होती. यामध्ये मागील 5 वर्षांची महिन्यानुसार माहिती देण्यात आली. यात एकूण वीज आकार खर्च, वापरलेले युनिटची माहिती देण्यात आली. त्यातून हा प्रकार समोर आला.
अनिल गलगली यांचा अर्ज आयुक्त कार्यालयाने डी विभागाच्या जलखात्याकडे हस्तांतरित केला. जल खात्याने अर्ज करनिर्धारक आणि संकलक खात्याकडे हस्तांतरित केला.अनिल गलगली यांस 5 जून 2024 पर्यंतची माहिती दिली.
1 एप्रिल 2010 पासून 31 मार्च 2023 पर्यंतची थकबाकी 3.89 लाख होती. तसेच 1 एप्रिल 2023 पासून 31 मार्च 2024 पर्यंतचे चालू बील देयक 67, 278 इतके आहे. यात सर्वसाधारण कर आणि जल कराचा समावेश आहे. विशेष म्हणजे जलमापक विरहित जलजोडणी आहे. जलमापक लावणे आवश्यक आहे. आयुक्त असो किंवा सामान्य नागरिक प्रत्येकांनी वेळेवर कर अदा करणे आवश्यक असल्याचे मत अनिल गलगली यांनी व्यक्त केले आहे.