मुंबई : गेल्या काही वर्षांपासून रखडलेला मुंबईतल्या मोनो या प्रकल्पाचा दुसरा टप्पा रविवारपासून सुरू होणार आहे. रविवारी सायंकाळी सहा वाजता वडाळा डेपो येथे वडाळा ते सातरस्ता या मोनोच्या दुसरा टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. मोनोच्या या दुसऱ्या टप्प्यात संत गाडगे महाराज चौक, लोअर परळ, मिंट कॉलनी, आंबेडकर नगर, नायगाव, दादर पूर्व, वडाळा पूल, आचार्य अत्रे नगर, अँटॉप हिल आणि जी. टी. बी. नगर ही स्थानकं असणार आहेत.
फेब्रुवारी २०१४ मध्ये मोनोचा चेंबूर ते वडाळा हा पहिला टप्पा सुरू झाला होता. या दोन स्थानकांच्या दरम्यानची स्थानकं ही फारशी वर्दळीची नसल्यामुळे मोनोला सुरुवातीपासूनच अपेक्षित प्रवासी संख्या मिळू शकली नाही. साहजिकच मोनोचा प्रवास हा तोट्यातच सुरू होता. मोनोला दरमहा किमान ८० लाख ते एक कोटींचा तोटा होत आहे. आजच्या घडीला रोज जेमतेम १५ हजार प्रवासी मोनोने प्रवास करतात. तर दिवसाला फक्त १८ ते २० हजार रुपयांचा महसूल तिकीट विक्रीतून मिळतो. त्यामुळे आता या दुसऱ्या प्रकल्पाच्या लोकार्पणानंतर तरी मोनो फायद्याची ठरते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दुसऱ्या टप्प्यात मोनोच्या प्रवासाच येणारी स्थानकं पाहता आणि कामाच्या वेळी त्या भागांमध्ये असणारी वर्दळ पाहता प्रवाशांची पावलं मोनोच्या दिशेने वळणार का, हे पाहणंही महत्त्वाचं ठरेल.
मुंबईकरांसमोर मोठी समस्या होऊन ठाकलेल्या वाहतूत कोंडीवर मोनो हा एत चांगला पर्याय ठरु शकते. पण, प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी म्हणून उचलण्यात आलेलं हे पाऊल सर्वसामान्यांच्या खिशाला चाप तर देणार नाही ना, हा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. त्यामुळे आता सर्व गोष्टींचा समतोल राखत मोनोच्या यशाकडे आणि तिच्या पहिल्या सफरीकडेच सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत.