मुंबई हादरली! पत्नीची छेड काढणाऱ्या अल्पवयीन मुलाची पतीकडून हत्या, मृतदेहाचे तुकडे किचनमध्ये लपवले

मुंबईत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नी आणि मेहुणीवर वाईट नजर ठेवत असल्याच्या संशयावरुन एका व्यक्तीने अल्पवयीन मुलाची निर्घृण हत्या केली. यानंतर मृतदेहाचे तुकडे करुन ते घरातल्या किचनमध्ये ठेवले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 

Updated: Aug 30, 2023, 09:15 PM IST
मुंबई हादरली! पत्नीची छेड काढणाऱ्या अल्पवयीन मुलाची पतीकडून हत्या, मृतदेहाचे तुकडे किचनमध्ये लपवले title=

अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुंबई : अल्पवयीन मुलाच्या निर्घृण हत्येने (Minor Boy Murderd) मुंबई  (Mumbai) हादरली आहे. पत्नी आणि मेहुणीची छेड काढत असल्याच्या केवळ संशयावरुन एका व्यक्तीने अल्पवयीन मुलाची कोयत्याने निर्घृण हत्या केली. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करुन ते किचनमध्ये लपवले. पण त्याचा गुन्हा फार काळ लपू शकला नाही.पोलिसांनी (Mumbai Police) आरोपीला अटक केली आहे. 

काय आहे नेमकी घटना?
मुंबईतल्या चेंबूर इथल्या म्हाडा वसाहतीत ही धक्कादायक घटना घडली. शफी अहमद अब्दुल माजिद शेख हा रिक्षाचालक पत्नीसह म्हाडा वसाहतीत राहतो. तर याच ठिकाणी राहाणाऱ्या सतरा वर्षांच्या इश्वर ललित पूत्रान या अल्पवयीन तरुणाची शफी अहमदने हत्या केली. इश्वर हा अनाथ होता. इश्वर लहान असताना ललित पुत्रन यांनी त्याला दत्तक घेतलं आणि त्याचा सांभाळ केला. ललित पुत्रन यांना दोन मुली आहे. यातल्या एका मुलीचं लग्न आरोपी शफी अहमद अब्दुल माजिद शेख याच्याशी 2020 मध्ये झालं. पण लग्न झाल्यापासूनच आरोपी शफीला ईश्वरचा स्वभाव आवडत नव्हता.

आपली पत्नी आणि तिच्या लहान बहिणीशी इश्वर लगट करत असल्याचा संशय त्याच्या मनात होता. तसंच इश्वर मानलेल्या बहिणींची वारंवार छेड काढत असल्याचा रागही त्याच्या डोक्यात होता. याबाबत आरोपी शफी अहमदने ललित पूत्रण यांना ही गोष्ट सांगितली. इश्वरचा आपल्या मानलेल्या बहिणींबरोबरचं वागणं ठिक वाटत नसल्याचं त्याने ललित पुत्रन यांना सांगितलं. पण ललित पुत्रण हा आपला मुलगा असून त्या त्याच्या बहिणी आहेत, बहिण भावामध्ये थट्टा-मस्करी होत असेल असं सांगत ललित पुत्रण यांनी हा विषय टाळला. पण आरोपी शफी अहमद याच्या डोक्यातून हा विषय जात नव्हता.

शफी अहमदने इश्वरला यासंदर्भात अनेकवेळा समजही दिली. पण यानंतरी इश्वरच्या स्वभावात बदल होत नसल्याने शफी अहमदचा पारा चढला होता. घटनेच्या दिवशी आरोपी शफीने इश्वरला घरी बोलावलं आणि पु्न्हा बहिणीशी असं न वागण्याची समज दिली. पण इश्वरने त्याला बोलणं उडवून लावलं. यावरुन दोघांमध्ये भांडण झालं. भांडणं टोकाला पोहोचलं, शफीने किचनमधला कोयता आणून इश्वरच्या मानेवर वार केला. हा वार इतका भीषण होता की इश्वरचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर शफीने कोयत्याने मृतदेहाचे हात, पाय आणि शीर धडावेगळं केलं. मृतदेहाचे चार तुकडे करुन ते त्याने प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरले.

त्यानंतर घरातील रक्ताचे सर्व डाग स्वच्छ केले. मृतदेहाच्या तुकड्यांच्या पिशव्याने आरोपी शफीने घरातल्या किचनमध्ये लपवले. दुसरीकडे 24 तास उलटून गेल्यानंतरही इश्वर घरी न आल्याने ललित पुत्रण यांनी इश्वरची शोधाशोध सुरु केली. पण त्याचा कुठेच पत्ता लागत नव्हता. ललित पुत्रन यांना शफीवर संशय आला, याबाबत त्यांनी शफीकडे विचारणा केल्यावर आपण इश्वरची हत्या करुन तुकडे किचनमध्ये ठेवल्याची कबुली त्याने दिली. 

ललित पूत्रन यांनी तात्काळ घटनेची माहिती पोलिसांना दिली. चेंबूरमधल्या आरसीएप पोलिसांना तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली. तपासात इश्वरच्या मृतदेहाचे तुकडे पोलिसांना किचनमध्ये सापडले.