Mhada lottery 2024: मुंबईत हक्काचं घर व्हावं, असे अनेकांचे स्वप्न असते. मात्र, गेल्या काही वर्षांत मुंबईत घरांच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळं प्रत्येकालाच मुंबईत घर घ्यायला परवडेल याची शक्यता कमीच आहे. त्यासाठीच म्हाडाकडून मुंबईत परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करुन दिली जातात. मागील वर्षी म्हाडाने चार हजार घरांसाठी लॉटरी काढली होती. तर, या वर्षीदेखील म्हाडा दोन हजार घरांची लॉटरी काढण्याच्या तयारीत आहे. लवकरच या घरांची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे.
म्हाडाने 2023 रोजी गोरेगाव, विक्रोळी येथे तब्बल चार हजार घरांची लॉटरी काढली होती. चार हजार घरांसाठी तब्बल लाखो जणांनी अर्ज दाखल केले होते. तर, या वर्षीयी म्हाडा गोरेगाव, पवई, विक्रोळी इत्यादी ठिकाणांच्या घरांचा समावेश या लॉटरीमध्ये करणार आहे. दोन हजार घरांच्या लॉटरीची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होऊ शकते. तर अधिकाधिक घरे ही गोरेगाव येथील असणार आहेत. या घरांच्या किंमती 34 लाखांपासून सुरू होणार आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकांनंतर लॉटरी काढली जाण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. तसंच, अनामत रक्कम जमा करण्याची प्रक्रियादेखील पूर्ण करण्यात येणार आहे. म्हाडा लॉटरीसाठी पूर्णपणे संगणीकृत पद्धतीचा वापर केला जाणार आहे. अशी माहिती समोर येत आहे.
जुलैअखेरपर्यंत जाहिरात जारी केली जाणार आहे. यावेळी गोरेगाव, पवई, विक्रोळी, दिंडोशी आणि अँटोप हिल येथे ही घरे असणार आहेत. तसंच, आता म्हाडाने कागदपत्रांची संख्याही कमी केली आहे. आता म्हाडा लॉटरीसाठी फक्त 7 कागदपत्रांची गरज भासणार आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड, डोमिसाइल सर्टिफिकेट, आयकर विभाग प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र हे कागदपत्र गरजेचे आहेत. लॉटरीच्या प्रक्रियेत सहभागी व्हायचे असेल तर नागरिकांनी ही कागदपत्रे जमा करुन ठेवावी, असं अवाहन म्हाडाने केले आहे.
मागील वर्षी म्हाडाने लॉटरी प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन केली होती. ज्या अर्जदारांना अर्ज करायचा आहे त्यांना आता लॉटरी जारी होण्यासाठी आता वाट पाहावी लागणार आहे. लॉटरी जारी होण्याआधीच म्हाडा वेबसाइटच्या माध्यमातून ऑनलाइन रजिस्टर करु शकणार आहेत. त्यानंतर लॉटरी जारी झाल्यानंतर अर्जदारांना फक्त घर सिलेक्ट करायचं आहे तसंच, अनामत रक्कम भरावी लागणार आहे.