शून्य आकार असलेल्या पुलावरुन मेट्रो धावणार, मुंबईचे सौंदर्य अधिक वाढवणार

Shunya Bridge in Mumbai:  मुंबईत ‘शून्य आयकॉनिक ब्रिज’ या केबल-स्टेड पुलाचे बांधकाम सूरू आहे. कुठे असणार हा ब्रिज जाणून घ्या

मानसी क्षीरसागर | Updated: Jan 14, 2025, 12:44 PM IST
शून्य आकार असलेल्या पुलावरुन मेट्रो धावणार, मुंबईचे सौंदर्य अधिक वाढवणार title=
Mumbai Metro's Shunya Bridge Starts Taking Shape to zero

Shunya Bridge in Mumbai: मुंबईत विविध प्रकल्पांचे काम हाती घेण्यात येत आहे. मेट्रो, उड्डाणपूल आणि विविध रस्त्यांचे काम प्रगतीपथावर आहे. लवकरच मुंबईच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या एक पूल उभारण्यात येणार आहे. वांद्रे-कुर्ला संकुल येथे (वाकोला नाला) शून्य या संकल्पनेचे महत्त्व अधोरेखित करणारा व स्थापत्य कामांतील वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना ठरेल असा आयकॉनिक केबल स्टेड पूल बांधण्यात येत आहे.

वाकोला नाल्यावर मेट्रो लाइन 2 बी व्हायाडक्टच्या शून्य आयकॉनिक ब्रिज या केबल स्टेड ब्रीजचे बांधकाम सुरू आहे. या पुलाची एकूण लांबी 130 मीटर असून 80 मीटर लांबीचा मुख्य स्पॅन व 50 मीटर लांबीचा बॅक स्पॅन प्रस्तावित आहे. उपरोक्त दोन्ही स्पॅन शून्य आकाराच्या पायलॉनवर आधारलेले आहेत. 

शून्य पायलॉनची उंची 39.46 मीटर व यासाठी वापरण्यात येणाऱ्या स्ट्रक्चरल स्टीलचे वजन सुमारे 700 टन आहे. एचडीपीई कोटेड स्टील स्पायरल स्ट्रँड केबल्स (स्टे केबल्स) पुलास आधार देण्याचे काम करतील.  सद्यस्थितीस सदर पुलाच्या पिअर क्र. 478 च्या पायाचे बांधकाम पूर्ण झाले असून दिनांक 02 ऑक्टोबर 2024 रोजी पायलॉनच्या 2 सेगमेंट उभारणीचे काम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले आहे. सद्यस्थितीत या प्रकल्पाचे 50% काम पूर्ण झाले आहे. 

झिरो आयकॉनिक पुलाच्या एका पिलरचे बांधकाम पूर्ण झाले आहे. एमएमआरडीएन ऑक्टोबरमध्ये पायलॉनचे दोन सेगमेंट यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. या मार्गिकेची सद्यस्थिती 78 टक्के काम पूर्ण झाले आहे. तर, उर्वरित काम संपवून ही मार्गिका लवकरात लवकर खुली करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी या पुलाचे काम कधी पूर्ण होते हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 

मेट्रो 2 ब हा मेट्रो मार्ग कसा आहे?

मेट्रो मार्ग-2ब (डि. एन.नगर-मंडाळे) या मार्गाची एकूण लांबी 23.6 कि. मी. एवढी असून यामध्ये एकूण 20 उन्नत स्थानकांचा समावेश आहे. डायमंड गार्डन (चेंबूर) ते मंडाळेपर्यंत ही मेट्रो धावणार आहे. सदर मार्ग हा पश्चिम द्रुतगती मार्ग, पूर्व द्रुतगती मार्ग, पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे, मोनोरेल, मेट्रो मार्ग -2अ (दहिसर ते डी एन नगर), मेट्रो मार्ग-3 (कुलाबा ते सिप्झ) आणि मेट्रो मार्ग -4 (वडाळा ते कासारवडवली) या महत्वाच्या मार्गांना जोडणारा आहे.