Metro 9: दहिसर ते मिरारोड मेट्रो 9 मार्गिकेतील कारशेड उत्तन येथील डोंगरीत बांधण्यात येत आहे. त्यामुळं पुन्हा एकदा मेट्रो 9 मार्गिका चर्चेत आली आहे. या मेट्रोमुळं प्रवाशांना कसा फायदा होईल आणि कोणत्या मार्गांना जोडणार, याची माहिची जाणून घेऊया.
दहिसर ते मिरारोड ही 10.05 किमीची मेट्रो 9 मार्गिका मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने हाती घेतली आहे. या मार्गिकेसाठी उत्तन, डोंगरीपर्यंत कारशेड बांधण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच या कारशेडचे काम सुरू करण्यात येणार आहे. कारशेडसाठी 59 हेक्टर जागा एमएमआरडीएने ताब्यात घेतली आहे. त्यामुळं लवकरच दहिसर ते मिरा भाईंदर मेट्रो - चा पहिला टप्पा सेवेत येण्याची शक्यता आहे. उत्तनमध्ये कारशेड करण्यासाठी सुमारे 3 किमी कॉरिडॉर वाढवण्यात आला आहे.
दहिसरहून मिरा-भाईंदरला जोडणाऱ्या मेट्रो-9 चा टप्पा डिसेंबर अखेर पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र अद्याप त्यासंदर्भात कोणतीही पुष्टी करण्यात आली नाहीय. दहिसर ते काशीगाव असा पहिला टप्पा असणार आहे. तर, काशीगाव ते नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान हा दुसरा टप्पा असणार आहे. या मेट्रोमुळं दहिसर नाक्यावरील वाहतूक कोंडी दूर होणार आहे तसंच मीरा-भाईंदर शहर मुंबईशहराशी जोडता येणार आहे. या मेट्रोमुळं नागरिकांचा प्रवास जलद करता येणार आहे.
मेट्रो 9 ही मुंबई उपनगर आणि मीरा भाईंदरला जोडण्यास महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. 10.08 किमीचा ही मार्गिका असून यात 8 स्थानकांचा समावेश असणार आहे. पहिले स्थानक हे दहिसर आहे. पहिल्या टप्प्यात चार स्थानकांचा समावेश आहे. दहिसर, पांडुरंग वाडी, मीरागाव आणि काशीगाव. तर, दुसऱ्या टप्प्यातील मेट्रो सेवा पुढील वर्षी सुरू करण्यात येणार आहे. 2019मध्ये मेट्रोच्या कामास सुरुवात झाली होती. मेट्रो सुरू झाल्यानंतर आता प्रवाशांना लोकलच्या गर्दीपासून थोडी सुटका मिळणार आहे.
मेट्रो 9 या मार्गिकेमुळं गुंदवली- अंधेरी ते मिरा भाईंदरमधील काशिमीरा दरम्यानचा प्रवास जलद करता येणार आहे. सध्या या मेट्रोचे काम 87 टक्के इतके झाले आहेत.