धक्कादायक : महापौर किशोरी पेडणेकर यांच्या भावाचा करोनामुळे मृत्यू

गेल्या सात दिवसांपासून त्यांच्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरू होते. 

Updated: Aug 1, 2020, 03:21 PM IST
धक्कादायक : महापौर किशोरी पेडणेकर यांच्या भावाचा करोनामुळे मृत्यू title=

मुंबई : देशातच नव्हे तर संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. अशात शनिवारी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या मोठ्या भावाचे करोनामुळे निधन झाले. सुनिल कदम असं त्यांच्या मोठ्या भावाचं नाव होतं. गेल्या सात दिवसांपासून त्यांच्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु उपचारा दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. महापौर किशोरी पेडणेकर यांनी भावाच्या आठवणीत ट्विटरवर एक पोस्ट देखील शेअर केली आहे. 

किशोरी पेडणेकर यांनी एक भावूक पोस्ट करत, 'माझा भाऊ सुनील कदम यांचे आज दुःखद निधन झाले. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, त्यांच्या कुटुंबियांना याा दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो हीच भगवान चरणी प्रार्थना..' असं त्यांनी लिहिलं. 

दरम्यान, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येत भारताने आता इटलीला देखील मागे टाकले आहे.  कोरोना मृतांच्या संख्येत भारत आता पाचव्या स्थानी पोहोचला आहे. महाराष्ट्रामध्ये एका दिवसात पुन्हा कोरोनाग्रस्तांच्या संख्येत १० हजारांपेक्षा जास्तने वाढ झाली आहे.

महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत १४,९९४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यातील कोरोना मृत्यूदर ३.५५ टक्के एवढा आहे. राज्यात काल आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी कोरोनाग्रस्तांची वाढ पाहायला मिळाली होती. गुरुवारी एका दिवसात कोरोनाचे ११,१४७ रुग्ण वाढले होते, तर २६६ जणांच्या मृत्यूची नोंद झाली होती.

मुंबईमध्ये शुक्रवारी कोरोनाचे १,०८५ रुग्ण सापडले आहेत. यामुळे मुंबईतली कोरोनाग्रस्तांची संख्या १,१४,२८४ एवढी झाली आहे. एका दिवसात मुंबईमध्ये ५३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मुंबईतली कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता ६,३५३ एवढी झाली आहे.