मुंबईत लोकल ऐवजी धावणार 'वंदे भारत मेट्रो', रेल्वेची मोठी घोषणा

Vande Bharat Metro: मुंबई लोकलने दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. आता याच प्रवाशांचा लोकल प्रवास गारेगार होणार आहे. कारण रेल्वे बोर्डाने मुंबईतील लोकल ट्रेनच्या संदर्भात एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. 

श्वेता चव्हाण | Updated: Jun 22, 2023, 05:54 PM IST
मुंबईत लोकल ऐवजी धावणार 'वंदे भारत मेट्रो', रेल्वेची मोठी घोषणा title=
Vande Bharat Metro

Vande Bharat Metro in Mumbai: मुंबईकरांचा लोकल प्रवास अधिक आरामदायी आणि गारेगार होणार आहे. दरम्यान मुंबई लोकल ट्रेनबाबत रेल्वे बोर्डाने एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला असून भारतीय रेल्वेकडून मुंबईत लोकल ऐवजी वंदे भारत मेट्रो चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या (MRVC) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे बोर्डाकडून मंजूरी मिळाल्यावर आता मुंबईतीत लोकलच्या जागेवर वंदे भारत मेट्रो चालवण्यात येतील. यासाठी रेल्वे बोर्डाने 238 वंदे भारत मेट्रो चालवण्याची योजना आखली आहे. 

नवीन वातानुकूलित लोकलच्या (Mumbai Local) देखभालीसाठी मुंबईत दोन नवीन कारशेड उभारण्यात येणार असून, त्यासाठी जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. लोकलच्या देखभालीसाठी डेपोच्या उभारणीला यापूर्वीच मंजुरी मिळाली आहे. वंदे भारत उत्पादक कंपन्यांच्या मदतीने हे डेपो उभारले जाणार आहेत. नवीन आधुनिक एसी लोकल या वंदे भारत मेट्रोच्या धर्तीवर बनवण्या येणार आहेत. मुंबई लवकरच दाखल होत असलेल्या एसी लोकल या वंदे भारत एक्सप्रेसच्या श्रेणीतील असतील. 

238 वातानुकूलित लोकलचा प्रस्ताव 

मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या (MUTP) मुंबई शहरी परिवहन प्रकल्पात मुंबईकरांच्या आरामदायी प्रवासासाठी एकूण 238 वातानुकूलित लोकल बांधण्याचा प्रस्ताव आहे. यामध्ये MUTP-3 मधील 47 आणि एमयूटीपी 3 अ मधील 191 वातानुकूलित लोकलचा समावेश आहे. आता या सर्व लोकल वंदे मेट्रो असणार आहेत. 

वंदे मेट्रोची वैशिष्ट्ये

वंदे मेट्रो लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजे असतील. सर्व लोकल वातानुकूलित असतील. प्रथम किंवा द्वितीय श्रेणी या लोकलमध्ये नसणार आहेत.  महिला, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र डबे असतील. प्रत्येक कोचमध्ये एलईडी दिवे असतील. या लोकलमध्ये सीसीटीव्ही आणि पॅसेंजर टॉक बँक सिस्टम असणार आहे.  

या ट्रेनला मेट्रोप्रमाणे आठ डबे 

वंदे भारत मेट्रो ही देशातील पहिली स्वदेशी  सेमी-हाय-स्पीड ट्रेन 'वंदे भारत'ची मिनी आवृत्ती आहे. याची घोषणा 2023-24 च्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, वंदे भारत मेट्रोमध्ये अत्याधुनिक रॅक असेल. यामधून सुमारे 100 किलोमीटरचे अंतर कव्हर करण्यात येईल. या ट्रेनला मेट्रोप्रमाणे आठ डबे असतील. सामान्य वंदे भारत एक्सप्रेसमध्ये 16 डबे असतात. वंदे भारत मेट्रो सुरू झाल्यानंतर मुंबईतील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. तसेच वंदे मेट्रो ही एकमेव स्वदेशी ट्रेन असून जी डिसेंबर 2023 पर्यंत रुळावर धावण्यास सुरुवात करेल. वंदे मेट्रो ट्रेनचे डिझाईन लवकरच समोर येईल. ही ट्रेन भारतीय रेल्वेसाठी क्रांतिकारी बदल ठरेल, असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले असते. वंदे मेट्रो ट्रेन 1950 आणि 1960 च्या दशकात डिझाइन केलेल्या अनेक ट्रेनची जागा घेईल.