Mumbai Local Train Update: मुंबईकरांचा प्रवास सोप्पा व आरामदायी व्हावा यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्नशील आहे. अर्थसंकल्पातही रेल्वेसाठी भरभक्कम तरतूद करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेवर प्रवाशांची गर्दी वाढत आहे. विरारकडे जाणाऱ्या लोकल या गर्दीने भरुन जातात. त्याचसाठी पश्चिम रेल्वे अंधेरी ते चर्चगेट स्थानकादरम्यान प्लॅटफॉर्मचे सर्वेक्षण करण्याचा विचार करत आहे. या स्थानकादरम्यान फलाटाचे रुंदीकरण करण्याची शक्यता आहे. जेणेकरुन 15 डब्ब्यांच्या लोकल धावू शकतील.
अंधेरी ते विरारदरम्यान सध्या 15 डब्यांच्या लोकल धावत आहेत. मात्र, 12 डब्यांच्या गाड्यांमध्ये गर्दी अधिक होते आणि गर्दी कमी करण्यासाठी 15 डब्यांच्या गाड्या चालवण्यात यावा, अशी मागणी वारंवार प्रवाशांकडून केली जाते. रेल्वेकडूनही या प्रकरणी उपाययोजना हाती घेण्यात येत आहे.
पश्चिम रेल्वेचे अधिकारी नीरज वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेच्या विस्तार प्रकल्पाचा मुख्य उद्देश हा आहे की, 12 डब्यांचा गाड्यावरील भार कमी करणे आणि अंधेरी आणि विरार दरम्यान आधीपासून धावणाऱ्या 15 डब्यांच्या गाड्यांचा जास्तीत जास्त वापर करणे हा आहे. रेल्वेने या प्रकल्पास मंजुरी दिल्यास या कामाचा खर्च अंदाजे 400 कोटी इतका आहे. या प्रकल्पामुळं प्रवाशांना आरामदायी प्रवास करता येणार आहे.
प्रवाशांचा प्रवास आरामदायी व्हावा हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. त्यामुळं सर्वात पहिले काम म्हणजे प्लॅटफॉर्मचा विस्तार केल्याने प्रवाशांना लोकलमध्ये चढणे आणि उतरणे खूप सुलभ होणार आहे. त्याचबरोबर, रेल्वे नेटवर्कच्या कार्यक्षमताही वाढेल. 15 डब्यांच्या गाड्यांना या प्लॅटफॉर्ममुळं मदत होईल. तसंच, प्लॅटफॉर्मच्या रुंदीकरणामुळं प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवास करता येणार आहे, असंही अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
प्लॅटफॉर्म विस्तारीकरण करण्याआधी पश्चिम रेल्वेकडून सर्वेक्षण करण्यात येईल. यावेळी पायाभूत सुविधा आणि प्लॅटफॉर्मचा विस्तार आणि त्याचा काय फायदा होईल याचे तपशीलवार नोंद करण्यात येईल. तसंच, या प्रकल्पाला हिरवा कंदिल मिळाल्यानंतर सर्वेक्षण आणि प्रकल्पानंतरच्या बांधकामाचा लोकल सेवेवर काही ही परिणाम होणार नाही, याची खात्री बाळगण्यात येईल. प्रवाशांची गैरसोय होणार नाही आणि काळजीपूर्वक नियोजन करण्यात येईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.
प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर मुंबईकरांची रोजच्या गर्दीपासून सुटका होणार आहे. तसंच, लोकलवरील ताणदेखील कमी होणार आहे. मात्र, प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणाचे काम सुरू करताना प्रवाशांना थोडा त्रास सहन करावा लागणार आहे. या प्रकल्पासाठी 400 कोटींचा खर्च येणार आहे. मात्र, या प्रकल्पामुळं मुंबईकरांना मोठा फायदा होणार आहे.