Mumbai Local Train Update: मुंबईकरांची लाइफलाइन म्हणजे लोकल. मात्र लोकलसाठी अनेकदा मुंबईकरांना ताटकळत राहावं लागतं. कित्येकदा लोकल तिच्या नेहमीच्या वेळेपेक्षा तीन-चार मिनिटे उशिराच येते. त्यामुळं चाकरमान्यांचे संपूर्ण वेळेचे गणित बिघडते. खरं तर दोन लोकलमधील अंतर तीन मिनिटांचे आहे. मात्र, दुसरी लोकल यायला बऱ्याचदा खूप उशिर होतो. त्यामुळं गर्दीदेखील वाढत जाते. पण लवकरच प्रवाशांची या त्रासातून सुटका होण्याची चिन्हे आहेत. दोन लोकलमधील अंतर आता तीन मिनिटांवरुन अडीच मिनिटांवर येणार आहे.
लोकलच्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी तीन्ही मार्गांवर लोकलना कवच प्रणालीबरोबरच कम्बाइन कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल सीबीटीसी यंत्रणा जोडली जाणार आहे. त्यामुळं दोन लोकलमधील अंतर 180 सेकंदावरुन 150 सेंकद म्हणजेच अडीच मिनिटांवर येणार आहे. ही यंत्रणा राबवणारे मुंबई हे पहिलेच शहर ठरणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या प्रणालीविषयी माहिती दिली आहे. दरम्यान, या नव्या प्रयोगामुळं मुंबईकरांना आता अडीच मिनिटांतच दुसरी लोकल मिळणार आहे. तसंच, लोकल फेऱ्यांची संख्यादेखील दुप्पटीने वाढणार आहे.
या नवीन प्रयोगामुळं उपनगरीय रेल्वे प्रवाशांना येत्या काही महिन्यातच जास्त वेळ रेल्वे स्थानकावर ताटकळत थांबावं लागणार नाहीये. तसंच, यामुळं लोकलच्या फेऱ्यादेखील वाढणार आहेत. अपघात कमी होण्याबरोबरच दोन गाड्यातील अंतरदेखील कमी होणार आहे. या नव्या प्रणालीमुळं मुंबईकरांचा प्रवास वेगवान व आरामदायक होणार आहे. ही प्रणाली कधीपासून सुरू होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये. यावर काम सुरू असल्याची माहिती समोर येतेय.
पश्चिम रेल्वे मार्गावर १ ऑक्टोबरपासून १२ डब्यांच्या १० गाड्यांचे रुपांतर १५ डब्यांत करण्यात येणार असून, त्यामध्ये १२ फेऱ्यांची संख्याही वाढविली जाणार आहे. यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गर्दी कमी होईल आणि अधिकाधिक प्रवाशांना वेळेत प्रवास करता येईल. आता १५ डब्यांच्या एकूण २०९ इतक्या फेऱ्या होणार आहेत. या लोकल अप आणि डाऊन अशा दोन्ही दिशेला धावणार असून, या वाढीव फेऱ्यांमुळे पश्चिम रेल्वेवरील फेऱ्यांची संख्या १३९४ वरून आता १४०६ होईल.