Chhagan Bhujbal Vs Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला एक वर्षांहून जास्त काळ झालाय.आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी आतापर्यंत सहा वेळा आमरण उपोषण केलंय मात्र,अद्याप मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही. राज्यात विधानसभा निवडणुका जवळ आल्यात अशातच जरांगे यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दिवसापासून पुन्हा आमरण उपोषण सुरू करण्याचं जाहीर केलंय. सरकारमधील मंत्री असलेल्या छगन भुजबळ यांना मराठयांना ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध आहे. याच मुद्दयावरून आंदोलक मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यात सातत्यानं आरोप-प्रत्यारोप होत असतात. अशातच आता राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी खळबळजनक दावा केला आहे.
आंतरवाली ज्यावेळी दगडफेक आणि लाठीमार झाला त्यावेळी मनोज जरांगे तिथून निघून गेला होता. रात्री दोन वाजता रोहित पवार आणि राजेश टोपे यांनी मनोज जरांगे यांना पुन्हा तिकडे आणून बसवले असा खळबळजनक दावा,भुजबळांनी केलाय.जरांगेंच्या मदतीला रोहित पवारांची टीम काम करत असल्याचा आरोपही भुजबळांनी केला
जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसाकंडून लाठीमार झाला. तेव्हा मनोज जरांगे निघून गेले होते. मात्र शरद पवार पक्षाचे आमदार राजेश टोपे आणि रोहित पवार यांनी मनोज जरांगेंना आंदोलस्थळी आणून बसवलं होतं, असा दावा, मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत केला. त्यानंतर घटनास्थळाला शरद पवारांनी भेट दिली. त्यानंतर उद्धव ठाकरेंनीही भेट दिली. मात्र,त्या दोघांनाही खरी परिस्थितीची माहिती नव्हती,असंही भुजबळांनी म्हटंलय. दरम्यान, भुजबळांनी त्यांना आलेला अनुभव सांगितला असेल असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय.
भुजबळांना मराठा आणि ओबीसीमध्ये वाद लाऊन फक्त दंगली घडवायच्या आहेत,अशी टीका मनोज जरांगे यांनी केलीय. ओबीसी बांधवांनी भुजबळांचं ऐकून भांडणं विकत घेऊ नये,असंही जरांगे यांनी म्हटलंय. आंतरवाली सराटीत लाठीमार झाल्यानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात मोठ्या प्रमाणात पेटला. लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाच्या मुद्याचा फटका लोकसभेतही महायुतीला बसला. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हैदराबाद गॅझेट लागू करण्याची मान्यता घेणार असल्याची माहिती आहे. लोकसभेला बसलेला फटका विधानसभा निवडणुकीत बसू नये यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असताना भुजबळ यांच्या खळबळजनक यांच्या दाव्यानं पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापणार आहे.