Mumbai Local Train Latest News: मुंबई लोकल आणि गर्दी हे समीकरण तर रोजचेच आहे. लोकलची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने अनेक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. दादर स्थानक हे सर्वाधिक गर्दीचे स्थानक आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेचे संयुक्त स्थानक आहे. त्यामुळं दोन्ही मार्गावरील लोकलची गर्दी होते. त्याशिवाय दादर जंक्शन असल्याने लांब पल्ल्याच्या गाड्याही दादर स्थानकात थांबतात. त्यामुळं प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात गर्दी होते. स्थानकातील ही समस्या रोखण्यासाठी मध्य रेल्वेने प्लॅटफॉर्म रुंदीकरणाचे काम हाती घेतले होते. यामुळं दादर स्थानकातील गर्दी कमी होणार आहे. होम प्लॅटफॉर्मच्या कामास सुरुवात झाली आहे.
मध्य रेल्वेने सध्याच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 10 चे रुपांतर डबल डिस्चार्ज प्लॅटफॉर्म म्हणून केले आहे. त्यामुळं आता लोकल पकडण्यासाठी दोन्ही बाजूंनी चढता व उतरता येणार आहे. डबल डिस्चार्ज प्लॅटफॉर्ममुळं आता संध्याकाळच्या वेळी दादर स्थानकातील गर्दी झपाट्याने कमी होणार आहे. दादर हे मुंबईतील सर्वात व्यस्त असे रेल्वे स्थानक आहे. त्यामुळं या स्थानकातील गर्दी कमी करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.
मुंबईहून दादर स्थानकातून दररोज सुमारे 150 फास्ट लोकल व लांब पल्ल्याच्या गाड्या सुटतात. कधीकधी लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्या 9 आणि 10 प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी येतात. त्यामुळं प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात गर्दी होते. कधीकधी लोकल पकडणाऱ्या प्रवाशांची घाई तर लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसमधून उतरणारे प्रवाशी अशा दोघांची गर्दी होते. यामुळं चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती उद्भवते. हीच स्थिती टाळण्यासाठी प्रवाशांना ट्रेनच्या दोन्ही बाजूंनी चढण्यास व उतरण्यास मदत होईल म्हणून मध्य रेल्वेने डबल डिस्चार्ज प्लॅटफॉर्म उभारण्याचा विचार केला आहे.
प्लॅटफॉर्म 10-11 चे होम प्लॅटफॉर्ममध्ये रुपातंर हे प्रवाशांच्या सोयी आणि सुरक्षितता वाढवण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा आहे. प्रवाशांसाठी प्लॅटफॉर्म क्रमांक 10 सुरू केल्याने त्यांना दोन्ही बाजूंनी चढण्यासाठी व उतरण्यासाठी सोयीचे होणार आहे. त्यामुळं स्थानकातील गर्दीदेखील कमी होणार आहे, असं एका अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.