मुंबई : Mumbai Local Pass : 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनापासून सामान्यांचा उपनगरीय रेल्वे प्रवास सुरु होणार आहे. कोविड लसीकरण पडताळणी आणि त्याआधारे रेल्वे पास देण्यास प्रारंभही झाला आहे. (Mumbai local train travel) पहिल्या सत्रात 18324 नागरिकांची पडताळणीझाली तर 17758 मासिक पास वितरित करण्यात आले आहे. मात्र, तुमच्याजवळ केवळ पास असून चालणार नाही तर लसीकरणाचे सर्टिफिकेट (Corona Vaccination Certificate) जवळ असायला हवे, अन्यथा टीसी तुमच्यावर कारवाई करु शकणार आहेत. तसे अधिकार त्यांना देण्यात आले आहेत.
मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांना उपनगरीय रेल्वे प्रवास करण्यास मुभा देण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. यानुसार काल बुधवारपासून मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 53 रेल्वे स्थानकांवर 358 मदत कक्ष सुरु करण्यात आले आहेत. मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर तसेच अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी प्रत्यक्ष रेल्वे स्थानकांवर भेटी देऊन या प्रक्रियेची पाहणी केली. दुपारी 3 वाजेपर्यंत 18 हजाराहून अधिक नागरिकांची पडताळणी पूर्ण झाली. त्यानुसार मासिक पासांचे वितरण करण्यात आले आहेत.
ज्या सर्वसामान्य नागरिकांना कोविड लशीचे दोन डोस घेतल्यानंतर 14 दिवस पूर्ण झाले आहेत, त्यांचे लसीकरण अंतिम प्रमाणपत्र आणि छायाचित्र असणारे ओळखपत्र पडताळण्यात येत आहे. या ऑफलाईन पडताळणीमध्ये पात्र ठरलेल्यांना रेल्वेकडून मासिक पास दिला जात आहे. त्याआधारे उपनगरीय रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.