मुंबई : Scholarship Exam : राज्यातील दहावी आणि बारावी परीक्षेचे निकाल लागले. त्यानंतर आता अॅडमिशनची लगबग सुरु झाली आहे. दरम्यान, अकरावीच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी सीईटी परीक्षा न्यायालयाने रद्द केल्याने नवा पेच निर्माण झाला असताना आता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा रद्द करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून ती घेण्यात येते. (Scholarship examination canceled in Mumbai)
मुंबईत 5वी आणि 8वीची शिष्यवृत्ती परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र औरंगाबादमध्ये जिल्हा परीषदेच्या शिक्षण विभागाद्वारे या परीक्षेची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. कोरोनामुळे या परीक्षंचं नियोजन कोलमडले आहे. आतापर्यंत सहा वेळा परीक्षेची तारीख बदलण्यात आली आहे. अखेर आज ही परीक्षा होत आहे. 5वीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातील 146 केंद्रे आणि 8वीच्या परीक्षेसाठी 108 केंद्रावर ही परीक्षा घेतली जाणार आहे.
पाचवी आणि आठवीचे राज्यभरातील विद्यार्थी गुरुवारी शिष्यवृत्ती परीक्षा देणार आहेत. मात्र मुंबईतील विद्यार्थ्यांना या परीक्षेपासून वंचित राहावे लागणार आहे. मुंबईत गुरुवारी परीक्षा होऊ न देण्याची भूमिका महापालिकेने घेतल्यामुळे मुंबईपुरती ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय बुधवारी संध्याकाळी घाईघाईने घेण्यात आला.
शिष्यवृत्ती परीक्षा सुरुवातीला 8 मे रोजी घेण्यात येणार होते. तसे नियोजन करण्यात आले होते. शिष्यवृत्ती परीक्षा तीन वेळा लांबणीवर टाकण्यात आली. अखेर 12 ऑगस्ट रोजी घेण्याचे परीक्षा परिषदेने निश्चित केले. मात्र, मुंबई महापालिकेच्या क्षेत्रात गुरुवारी परीक्षा घेऊ नयेत, असे आदेश महापालिकेच्या आयुक्तांनी दिले. कोरोनामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात यावी किंवा ऑनलाइन घ्यावी, अशी मागणी परीक्षा परिषदेकडे करण्यात आली.
मात्र, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने या दोन्ही पर्यायांचा विचार केला नाही. त्यामुळे मुंबईत महापालिका क्षेत्रातील शाळांमध्ये गुरुवारी होणारी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय काल घेण्यात आला. त्यामुळे महापालिका आणि खासगी शाळांमधील जवळपास 25 हजार विद्यार्थ्यांची तयारी करूनही त्यांना परीक्षा देता येणार नाही.