फटका गँग पुन्हा सक्रीय? दिवा स्थानकात 22 वर्षांच्या तरुणाने गमावला हात, लोकलच्या दारातच...

Mumbai Local  Train News Update: मुंबई लोकल आणि गर्दी हे तर नित्याचे आहे. लोकल प्रवास कठिण होत असतानाच आता प्रवाशांपुढे नवीन आव्हान उभे ठाकले आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Feb 21, 2024, 12:58 PM IST
फटका गँग पुन्हा सक्रीय? दिवा स्थानकात 22 वर्षांच्या तरुणाने गमावला हात, लोकलच्या दारातच...  title=
mumbai local train news passenger lost hand due to fatka gang in diva station one held

Mumbai Local Train News: मुंबई लोकल ही मुंबईची लाफइलाइन समजली जातेय. मात्र, याच मुंबई लोकलमध्ये गुन्हेगारांची संख्याही वाढत चालली आहे. गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचा मोबाइल किंवा पाकिट लंपास करण्याचे प्रकार सर्रास घडत असतात. तर, कधी फटका गँगची दहशतही असतेच. असाच एक प्रकार दिवा रेल्वे स्थानकात घडला आहे. लोकलच्या दारात मोबईल घेऊन उभा असलेल्या प्रवाशांवर फटका गँगने हल्ला केला. या घटनेत प्रवाशाला हात गमवावा लागला आहे. 

दिवा रेल्वे स्थानकातील हा प्रकार रविवारी घडला होता. मात्र मंगळवारी हा उघडकीस आला आहे. शशिकांत कुमार (22) असं या प्रवाशाचे नाव आहे. कुमार हे घणसोली येथे राहतात. रविवारी रात्री ते घरी परतत असताना लोकलच्या दरवाजात उभे होते. रात्री 11.55 वाजण्याच्या सुमारास लोकल दिवा स्थानकात आली. लोकल स्थानकात येताच आरोपीने त्यांच्या हातावर फटका मारुन मोबाईल लंपास करण्याचा प्रयत्न केला. 

आरोपीचा फटका बसल्याने शशिकांत कुमार यांचा तोल गेला आणि ते खाली कोसळले. फलाट आणि पायदान यांच्यातील अंतर असलेल्या जागेत पडल्याने त्यांचा डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली. खांद्यापासून त्यांना डावा हात गमवावा लागला आहे. या घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी शशिकांत कुमार यांना पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले आहे. मात्र, या घटनेने फटका गँग पुन्हा सक्रीय झालीये का? असा सवाल उपस्थित होत आहे. 

दरम्यान, आरोपीने कुमार यांच्यावर हल्ला केल्यानंतर इतर प्रवाशांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. या प्रकरणात लोहमार्ग पोलिसांनी आरोपी गणेश शिंदे (29) याला अटक केली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

फटका गँगची दहशत

फटका गँगची दहशत गेल्या काही वर्षांपासून मुंबईकरांमध्ये होती. गर्दीच्या वेळी दारात उभ्या असलेल्या प्रवाशांच्या हातावर काठीने फटका मारुन हातातील पिशवी, मोबाईल लंपास करण्याचे प्रकार पूर्वी घडले होते. फटका गँगची दहशत वाढल्यानंतर पोलिसांनी विशेष अभियान राबवून कारवाई सुरू केली होती. त्यानंतर हे प्रकार थांबले होते. पण या घटनेनंतर पुन्हा एकदा फटका गँग सक्रीय झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या सगळ्या घटनेनंतर आता लोहमार्ग पोलिस काय पावलं उचलणार हे पाहणं गरजेचं आहे. 

धावत्या लोकलमध्ये तरुणीवर बलात्कार

काही महिन्यांपूर्वी मुंबईतील हार्बर मार्गावरील धावत्या लोकलमध्ये एका 20 वर्षांच्या तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. धावत्या लोकलमध्ये महिलांच्या डब्यात चढून तरुणीवर बलात्कार केल्याच्या घटनेने राज्यात संतापाची लाट उसळली होती.