Mumbai Local Update : मध्य रेल्वेच्या (Central Railway) हार्बर मार्गावर लोकल ( Harbor Local Line) वाहतूक सकाळी सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे (Signal system failure) विस्कळीत झाली होती. मात्र आता सिग्नल यंत्रणेतला बिघाड दूर करण्यात आला आहे. त्यामुळे पनवेल वाशी वाहतूक सुरू झाली आहे. वाशीहून पनवेलकडे लोकल रवाना झाली आहे. पहाटे जुईनगरजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे वाशी ते पनवेल वाहतूक बंद होती. त्यामुळे चाकरमान्यांचे हाल होत होते. मात्र आता पनवेल ते सीएसएमटी आणि पनवेल ते ठाणे वाहतूक सुरू झालीय. मात्र गाड्या वेळापत्रकानुसार धावत नाहीत. (Mumbai Local Faces Signal Problem at Juinagar Railway Station)
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल ट्रान्स हार्बर मार्गावर सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे गुरुवार सकळी रेल्वे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. जुईनगर रेल्वे स्टेशन येथे सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळं सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक स्थगित करण्यात आली होती. दरम्यान, मुंबई ते वाशी पर्यत लोकल सेवा सुरू ठेवण्यात आली होती. सीएसएमटीकडून येणाऱ्या पनवेल गाड्या वाशी येथे रद्द करण्यात येत होत्या. त्यामुळे अनेकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागला. दरम्यान वाशी ते सानपाडा आणि सानपाडा ते वाशी असा रिक्षा प्रवास करणाऱ्यांना अधिकच पैसे मोजावे लागत होते. रिक्षा चालक मीटर न टाकता 30 रुपये घेत होते. त्यामुळे प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत होती.
दरम्यान, वाशी ते ठाणेही वाहतूक बंद होती. काही गाड्या रद्द करण्यात आल्यामुळे सानपाडा आणि वाशी रेल्वेस्थानकावर सकाळी मोठी गर्दी पाहायला मिळाली. जुईनगर येथील सिग्नल यंत्रणेत दुरुस्तीचे काम तातडीनं हाती घेण्यात आले. तोपर्यंत उशिर झाला. साधारण दहा ते 15 मिनिटांत काम पूर्ण होण्याची माहिती रेल्वे प्रशासनानं दिली होती. मात्र, प्रत्यक्ष 20 ते 25 मिनिटे दुरुस्तीच्या कामाला लागले. दरम्यान, लोकल सेवा ठप्प झाल्याने सकाळी पनवेल, खारघर, बेलापूर, सानपाडा भागातून मुंबई गाठणाऱ्यांचे हाल झालेत. दरम्यान, वाहतूक अद्याप उशिराने सुरुच आहे.
रेल्वे मार्गानं प्रवास करत मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या आणि नोकरीसाठी सकाळच्या वेळी घराबाहेर पडणाऱ्यांची या गैरसोयीमुळं मोठी तारांबळ उडाली. शाळा आणि महाविद्यालयांच्या दिशेनं निघालेल्या विद्यार्थ्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पहाटेपासूनच रेल्वेसेवा ठप्प असल्यामुळे आता पर्यायी मार्गांअभावी प्लॅटफॉर्मवर गर्दी वाढत असल्याचंही पाहायला मिळत होते.