गणपती बाप्पा मोरया! श्रीगणेशमूर्तीवर शिक्का उमटवण्याचा 'तो' निर्णय अखेर रद्द

श्रीगणेश भक्तांच्या भावना लक्षात घेऊन श्रीगणेश मूर्तींवर शिक्का न उमटविण्याचे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिले आहेत. तसंच श्रीगणेश मूर्तींवर शिक्का न मारण्याच्या निर्णयाची माहिती मूर्तीकारांपर्यत प्रभावीपणे पोहोचविण्याचेही  आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. 

देवेंद्र कोल्हटकर | Updated: Sep 12, 2023, 06:59 PM IST
गणपती बाप्पा मोरया! श्रीगणेशमूर्तीवर शिक्का उमटवण्याचा 'तो' निर्णय अखेर रद्द title=

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : यंदाचा गणेशोत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक (Environment Friendly) व्हावा, यासाठी श्रीगणेश मूर्तींवर सांकेतिक रंगाचा शिक्का  (Symbolic Color Stamp) उमटविण्याचे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका (Mumbai Municipal Corporation) प्रशासनामार्फत सुरुवातीला देण्यात आले होते. पर्यावरण पूरक आणि इतर मूर्तींमधला फरक कळावायासाठी हे आदेश देण्यात आले होते. श्रीगणेश भक्तांच्या भावना लक्षात घेऊन श्रीगणेश मूर्तींवर शिक्का न उमटविण्याचे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांनी दिले आहेत. तसंच श्रीगणेश मूर्तींवर शिक्का न मारण्याच्या निर्णयाची माहिती मूर्तीकारांपर्यत प्रभावीपणे पोहोचविण्याचेही  आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. 

मनपाच्या या निर्णयाला श्रीगणेशोत्सव समन्वय समितीचा विरोध केला होता. हा विरोध लक्षात घेता  सांकेतिक रंगाचा शिक्का किंवा खूण न उमटविण्याचं श्रीगणेशोत्सव समन्वयासाठी आयोजित महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बैठकीत ठरवण्यात आलं. पण हा निर्णय रद्द झाल्याची माहिती मूर्तीकारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचलेली नसल्याची बाब मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री (Mumbai Guardian Minister)  मंगल प्रभात लोढा यांनी महानगरपालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे हा निर्णय मूर्तीकारांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचविण्याची कार्यवाही तातडीने करावी, असे आदेश पालकमंत्री लोढा यांनी  महानगरपालिका प्रशासनास दिले आहेत. 

पालकमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशांनुसार तात्काळ कार्यवाही करत बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी सर्व परिमंडळीय सह आयुक्त / उप आयुक्त आणि विभागीय सहाय्यक आयुक्त यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील मूर्तीकारांना आणि मूर्तीकार संघटनांपर्यंत ही माहिती तातडीने पोहोचविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार विभाग स्तरावर मूर्तीकारांशी संपर्क साधण्याची कार्यवाही तात्काळ सुरु करण्यात आली आहे. 

"गणेश उत्सव हा प्रत्येकाच्या आस्थेचा विषय आहे, मुंबईत या उत्सवाचे खास महत्व आहे.  गणेशा मूर्तीला पवित्र मानून त्याची मनोभावे पूजा केली जाते. त्यामुळे कोणाच्याही श्रद्धेला धक्का लागणार नाही याची  काळजी घ्यावी घेण गरजेचं आहे.त्यामुळे गणेशमूर्तींवर शिक्का मारणे किंवा रंग देणे योग्य नाही. यामुळे लाखो हिंदूंच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. पर्यावरणपूरक आणि इतर मूर्तींमधील फरक समजावा यासाठी मूर्तीवर कोणत्याही प्रकारची रंगरंगोटी किंवा शिक्केबाजी नको, त्याऐवजी दुसरा पर्याय शोधण्याबाबत निर्देश दिल्यांच पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी म्हटलंय.

येत्या 19 सप्टेंबरपासून राज्यात गणेशोत्सवाला सुरुवात होईल. मुंबईत अनेक मोठ्या मंडळाच्या गणपतीचं आगमन झालं आहे.