मुंबई : चर्चमध्ये मुलाचा मृतदेह ठेऊन तो जिवंत होईल अशी अंधश्रद्धा बाळगणाऱ्या एका कुटुंबाला अंबरनाथ पोलिसांनी रोखलं.
याआधी याच कुटुंबाने नागपाडा चर्चमध्ये 9 दिवस प्रार्थना करून हा मृतदेह जिवंत करण्याचा प्रयत्न केला होता. अंबरनाथच्या जीजस फॉर ऑल नेशन्स या चर्चमध्ये 5 नोव्हेंबरला अजब नाट्य घडलं. मुंबईच्या मिशाख नेव्हीस या तरूणाचा मृतदेह घेऊन त्याचे नातेवाईक चर्चमध्ये पहाटे पाच वाजता पोहोचले. मृत मिशाख नेव्हीसच्या कुटुंबियांचा असा विश्वास होता की मृतदेह जिजससमोर ठेऊन प्रार्थना केली तर जिजस त्यात पुन्हा प्राण टाकेल आणि मुलगा जिवंत होईल. नेव्हीसचे वडील मुंबईच्या नागपाडा इथल्या चर्चचे बिशप आहेत.
तरूण मुलाचा मृत्यू झाल्याने कष्टी झाल्यामुळे त्यांनी त्याला पुन्हा जिवंत करण्याचे प्रयत्न सुरू केले. 9 दिवस चर्चमध्ये मृतदेह ठेऊन त्यांनी प्रार्थना केली. अखेर नागपाडा पोलिसांनी यात हस्तक्षेप केला आणि तरूणावर अंत्यसंस्कार करण्याची सूचना दिली. मात्र ही प्रार्थना सुरूच ठेवण्याचा निर्णय मिशाख कुटुंबियांनी घेतला आणि मृतदेह अंबरनाथला पहाटे पाच वाजता नेला. तिथेही प्रार्थना सुरू केली. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करून तरूणावर अंत्यसंस्कार करण्याचा सल्ला पोलिसांना दिला. अखेर मिशाख कुटुंबियांनी हा मृतदेह चिंचपोकळी इथे राहत्या घरी नेला.
मिशाखचा मृतदेह ज्या चर्चमध्ये आणण्यात आला ते चर्च अंबरनाथच्या नारायण चित्रपटगृहात आहे. या प्रकारामुळे आता चर्चच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. चर्चवर अंधश्रद्धा प्रकरणी गुन्हा दाखल होण्याती शक्यता आहे.